परभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम रक्कम
By मारोती जुंबडे | Published: September 10, 2022 04:06 PM2022-09-10T16:06:02+5:302022-09-10T16:07:09+5:30
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या व कृपेचा मोठा फटका बसला.
परभणी: ऑगस्ट महिन्यात सतत २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील आठ मंडळातील सोयाबीनच्या उत्पादनात जवळपास ५० ते ५७ पर्यंत घट अपेक्षित आहे. त्यामुळे पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केवळ आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ९ सप्टेंबर रोजी पिक विमा कंपनीला दिले आहेत.
खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस, उडीद, तूर, मूग आदी पिकांची पेरणी केली आहे. जून महिना पूर्णतः कोरडा गेल्याने जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने खरीपातील पिके चांगलीच बहरली. मात्र ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पावसाने सतत २१ दिवस खंड दिल्याने बहरात असलेल्या सोयाबीन पिकाला निसर्गाच्या व कृपेचा मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सोयाबीन पिकाच्या पीक परिस्थितीचा अहवाल, प्रजन्यमान अहवाल, स्थानिक प्रसारमाध्यमांचा बातम्या, दुष्काळ सदस्य परिस्थिती या आधारे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा कमी आहे, असे जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात निदर्शनास आल्यामुळे हे महसूल मंडळ नुकसान भरपाईस पात्र असल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे सोयाबीनच्या संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आग्रीम रक्कम पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला आदेशित करण्यात आले आहे. ही रक्कम अधिसूचना जाहीर झाल्यापासून विविध मुदतीत सांभाव्य नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी केवळ आठ मंडळातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार आहे.
या मंडळांचा समावेश
सतत २१ दिवस पावसाचा खंड झाल्याने जिल्ह्यातील आठ मंडळात ५२ ते ५७ टक्क्यापर्यंत सरासरी उत्पादनाच्या तुलनेत घट आली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील झरी, शिंगणापूर, जांब व गंगाखेड तालुक्यातील माखणी, पूर्णा तालुक्यातील चुडावा, मानवत तालुक्यातील रामपुरी, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ तर जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळाचा समावेश आहे. या मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रकमेचा महिनाभरात लाभ मिळणार आहे.