परभणी जिल्ह्यात जन्मदरातील तफावत वाढली; सहा वर्षांत सरासरी हजार मुलांमागे केवळ ८७८ मुली
By मारोती जुंबडे | Published: December 5, 2023 06:09 PM2023-12-05T18:09:36+5:302023-12-05T18:10:12+5:30
२०१७ पासून २०२२ या सहा वर्षांचा विचार केला तर मुलींचे प्रमाण १ हजारांमागे सरासरी ८७८ एवढे आहे.
परभणी : जिल्ह्यामध्ये मुले आणि मुली यांच्या जन्मदरामध्ये मोठा फरक आहे. २०१७ पासून २०२२ या सहा वर्षांचा विचार केला तर मुलींचे प्रमाण १ हजारांमागे सरासरी ८७८ एवढे आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या मुलाला लग्नासाठी मुलगी देता का मुलगी अशी स्थिती दिसून येणार आहे. या जन्मदरातील तफावत दूर करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.
जिल्ह्यात २०१० मध्ये मुलींचा जन्मदर हा १ हजार मुलांमध्ये ८७६ एवढा होता.
२०१६ मध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ होवून १ हजार मुलांमध्ये ९४२ मुलींचा जन्म झाल्याची नोंद आहे.
२०२१ मध्ये हा जन्मदर ९९३ वर पोहचला. अशी स्थिती कायम राहणे आवश्यक होते. मात्र तसे होताना दिसून येत नाही. २०२२ मध्ये घसरण झाली.
बेटी बचाओं बेटी पढाओ प्रभाव दिसेना...
आरोग्य विभागासह प्रशासनाकडून मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजनाही मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात दहा महिन्यात १७०० जन्म
परभणी शहरात मागील १० महिन्याच्या मनपाच्या जन्म विभागाकडे नोंद झालेल्या आकडेवारीनुसार १०५७ मुलांचा तर ६८६ मुलींचा जन्म झाला असल्याची नोंद आहे.
बालमृत्यू कमी करण्यावर भर
गर्भधारणा कालावधीत वेळेवर न घेतले जाणारे उपचार, सकस आहाराकडे होणारे दुर्लक्ष, बालकांच्या जन्मानंतर घेतली न जाणारी काळजी, लसीकरणाकडे मातांचे होणारे दुर्लक्ष, कुपोषण यासह इतर विविध कारणांनी जिल्ह्यात बाल मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गत वर्षभरात १०१ बालकांचा मृत्यू झाला असून, जग पाहण्याआधीच हे बालक देवाघरी गेले आहेत; मात्र २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये १८ बालमृत्यू कमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाला बालमृत्यू रोखण्यात कुठेतरी यश येताना दिसून येत आहे.
वर्षभरात १०१ बालमृत्यू
जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात ११९ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या वर्षभराच्या कालावधीत १०१ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या तुलनेत १८ ने बालमृत्यू कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाचे काम यशस्वी होताना दिसून येत आहे.