धक्कादायक! परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले पाच बाल विवाह
By राजन मगरुळकर | Published: March 9, 2023 07:37 PM2023-03-09T19:37:59+5:302023-03-09T19:39:34+5:30
परभणी चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकवर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर यंत्रणेने केली कारवाई
परभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील तीन, जिंतूर तालुक्यातील दोन असे एकूण पाच बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला, बालविकास अधिकारी कार्यालय आणि चाईल्ड लाईनच्या पथकाला यश आले आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील एकूण पाच बालविवाह थांबविण्यात आले. परभणी चाईल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकवर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदरील बाल विवाह कुठे होणार आणि कोणाचे होणार, याची खात्री करत मुलींचे आणि मुलांचे वयाचे पुरावा हस्तगत करण्यात आले. चाईल्ड लाईन
जिल्हा समन्वयक संदीप बेंडसुरे आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्या समन्वयाने वेगवेगळ्या टीम तयार करून सदरील बालविवाह होणाऱ्या स्थळावर पाठविल्या. स्थानिक प्रशासन,अंगणवाडी सेविका, सरपंच, पोलीस, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि बाल ग्राम संरक्षण समितीचे सदस्य यांच्या मध्यस्तीने सोनपेठ तालुक्यातील तीन आणि जिंतूर तालुक्यातील दोन बालविवाह थांबवण्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि चाईल्ड लाईन यांना यश आले. कार्यावाहीसाठी कैलास तिडके, संदीप बेंडसुरे, अनंता सोगे, राणी गरुड, आम्रपाली पाचपुंजे, भारत ढगे, राहुल देशमुख, यशवंत सोनकांबळे यांनी काम पाहिले.
बालकल्याण समितीसमोर हजर होण्याच्या सूचना
पुढील काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने बालविवाहातील मुलींना तसेच मुलांना बालकल्याण समिती परभणी यांच्या समक्ष हजर होण्यासाठी सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केले आहे. तसेच सोबत त्यांचे पालकही हजर होणार आहेत.