परभणीत पोतराज, गोंधळी, तृतीयपंथीयांच्या आंदोलनाने वेधले लक्ष
By राजन मगरुळकर | Published: August 29, 2022 04:40 PM2022-08-29T16:40:40+5:302022-08-29T16:41:36+5:30
मानवतचे बनावट कृषी निविष्ठा प्रकरण : जिल्ह्यातील मानवत येथे ९ ऑगस्ट रोजी बनावट कृषी निविष्ठा पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या.
परभणी : मानवत येथील बनावट कृषी निविष्ठा प्रकरणातील आरोपींवर कृषी कायद्यांतर्गत कृषी विभागाने स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निषेध आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलनात पोतराज, गोंधळी आणि तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदवून कलांचे सादरीकरण करत घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यातील मानवत येथे ९ ऑगस्ट रोजी बनावट कृषी निविष्ठा पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. शेतकरी तसेच काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. मात्र, यात पोलीस तपासात उघड झालेल्या व्यापाऱ्यावर कृषी कायद्यांतर्गत अद्याप स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी बचाव कृती समितीने याबाबत निषेध नोंदविला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोतराज, गोंधळी, तृतीयपंथीयांनी एकत्र येत कार्यालयासमोर काही वेळ लोकगीत, नाच, गाणे गाऊन प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याचा निषेध नोंदविला. आंदोलनात सुनील बावळे, अर्जुन पंडित, रामप्रसाद बोराडे, मारुती साठे, त्रिंबक शेळके, शिवाजी सोनवणे, गणेश देशमुख, रमेश लोखंडे, दीपक गुळवे, उद्धव शिंदे यांचा सहभाग होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले.
या मागण्यांचा समावेश
यात बनावट कृषी निविष्ठा निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व कंपन्यांच्या औषधी, खते, बियाणे यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात यावी, गुणवत्ता चाचणीत निकृष्ट आढळलेल्या कंपनीच्या सर्व उत्पादनांची विक्री तत्काळ थांबवावी, भेसळयुक्त कृषी निविष्ठा, खते, बियाणे विक्री करणाऱ्यांचे परवाने तत्काळ निलंबित करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. सुमारे अर्धा तास हे निषेध आंदोलन घेण्यात आले.