परभणीत मार्च महिन्यातच तापमानाने गाठली चाळिशी
By राजन मगरुळकर | Published: March 27, 2024 04:55 PM2024-03-27T16:55:53+5:302024-03-27T16:57:12+5:30
वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे. याशिवाय उकाड्यातही वाढ झाली आहे.
परभणी : शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानाने मार्च महिन्यातच चाळिशी गाठली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवनावर दुपारच्या वेळी परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. सलग तीन दिवसांपासून कमाल तापमान ३९.७ अंश सेल्सियस नोंद झाले आहे.
परभणी जिल्ह्यात दरवर्षीच तापमान ४० ते ४५ अंशांच्या आत नोंद होत असते. एप्रिल तसेच मे महिन्यात या तापमानाची नोंद होते. यंदा मात्र, मार्च महिन्यातच तापमानात दररोज सातत्याने वाढ होत आहे. परभणी शहर परिसरात रविवारपासून दररोज तापमान ३८ अंशांच्या पुढे सरकले आहे. यामध्ये मंगळवारी ३९.७ तर बुधवारी सुद्धा ३९.७ एवढे तापमान नोंद झाले. कमाल तापमान ४० जवळ तर किमान तापमान हे २५ अंशांवर पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे. याशिवाय उकाड्यातही वाढ झाली आहे. जिल्हाभरात सध्या तापमान वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ग्रामीण भागातील शेतीच्या कामावर सुद्धा याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
असे होते चार दिवसांचे कमाल तापमान
रविवार ३८ अंश सेल्सिअस
सोमवार ३८.६
मंगळवार ३९.७
बुधवार ३९.७
या जिल्ह्यात पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या प्राप्त अंदाजानुसार शनिवारी लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमानात वाढ होऊन रात्रीच्या वेळी उष्णता जाणवेल व कमाल तापमानात त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात २९ मार्च ते चार एप्रिल दरम्यान पाऊस कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.