परभणीत आज महिला पोलिसांनी सांभाळली वाहतूक व्यवस्थेची धुरा
By राजन मगरुळकर | Published: March 8, 2024 06:26 PM2024-03-08T18:26:03+5:302024-03-08T18:26:25+5:30
परभणीत वाहतूक शाखेचा आगळावेगळा उपक्रम
परभणी: जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. याच निमित्ताने शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक शाखेत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर वाहतूक व्यवस्थेची धुरा एक दिवसासाठी शुक्रवारी सोपविली होती. यामध्ये नऊ महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. त्यांचा सन्मान करून त्यांनी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न केले.
शहरात जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन यांच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी रॅली, सन्मान सोहळा घेण्यात आला. याच निमित्ताने पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक वामन बेले यांनी कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसासाठी वाहतूक व्यवस्थेची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविली.
या निमित्ताने या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच लॉयन्स क्लब प्रिन्सतर्फे वाहतूक शाखेतील महिला पोलिसांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष रोहित गर्जे, सचिव मनोहर चौधरी, डॉ. विजय इंगोले, उल्हास नाव्हेकर, डॉ. प्रवीण धाडवे, सुनील मोडक, विकी नारवाणी उपस्थित होते. वाहतूक शाखेतील सहायक पोलिस उपनिरीक्षक यमुना आत्राम, पोलिस कर्मचारी माया पैठणे, आम्रपाली मुजमुले, सुनीता वावळे, सुरेखा डिब्बे, ज्योती भारशंकर, सुनीता राठोड, तेजश्री गायकवाड, नेहा जाधव यांनी या उपक्रमात दिवसभर महिला दिनी वाहतूक व्यवस्था सांभाळली. सहायक पोलिस निरीक्षक वामन बेले, उपनिरीक्षक मकसूद पठाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांचा सन्मान केला.