अनलॉक हाेताच मोबाइल चोरीसह लुटीच्या घटना शहरात वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:20+5:302021-07-05T04:13:20+5:30

परभणी शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात लॉकडाऊनपूर्वी मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक ...

Incidents of looting, including mobile theft, have increased in the city | अनलॉक हाेताच मोबाइल चोरीसह लुटीच्या घटना शहरात वाढल्या

अनलॉक हाेताच मोबाइल चोरीसह लुटीच्या घटना शहरात वाढल्या

Next

परभणी शहरातील बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात लॉकडाऊनपूर्वी मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक महिन्यात मोबाइल चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. चोरी गेलेल्या मोबाइलचा तपास मात्र संथगतीने होत आहे.

मध्यंतरी लॉकडाऊनमुळे या घटना कमी झाल्या होत्या. मात्र जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा मोबाइल चोरीसह इतर लुटीच्या घटना वाढल्या आहेत.

मागील आठवड्यात बसस्थानक परिसरात मारहाण करून एका प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे याच भागात मागील वर्षीदेखील मोबाइल चोरी होण्याचे प्रकार सातत्याने घडले आहेत. अनलॉकनंतर या प्रकारांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

तक्रारींची एकत्रित माहितीच उपलब्ध नाही

परभणी शहरात लॉकडाऊन काळात मोबाइल चोरीच्या घटना कमी झाल्या असल्या तरी या चोरीच्या प्रकरणांची एकत्रित माहिती पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आतापर्यंत किती मोबाइल चोरीला गेले आणि किती मोबाइल तक्रारकर्त्यांना परत केले, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

जिंतूर प्रकरणात परत केले मोबाइल

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जिंतूर येथे मोबाइल शॉपी फोडण्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील सुमारे ७० ते ८० मोबाइल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते.

५० टक्के मोबाइलचा तपास लागतच नाही

परभणी शहरात चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक महिन्यात मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंद केल्या जातात. मात्र यात तपास पूर्ण होऊन संबंधिताला मोबाइल परत करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये अनेक वेळा तक्रारकर्त्यांकडे त्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक नसतो. तसेच मोबाइल खरेदी केल्याची पावतीही नसते. त्यामुळे अनेक प्रकरणात मोबाइल चोरीचा तपास करताना पोलिसांसमोर तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

मोबाइल चोरी प्रकरणांत होते दुर्लक्ष

शहरासह जिल्ह्यात मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये तक्रार दाखल होते. मात्र बहुतांश वेळा मोबाइलची किंमत कमी असते. त्यामुळे या चोरी प्रकरणाचा तपासही संथगतीने होतो. आरोपीने त्या मोबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकले तरच तो ट्रेस होतो. त्यामुळे मोबाइल चोरीच्या तक्रारी तर दाखल होतात. मात्र त्याचा तपास लागण्याचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांपर्यंतच आहे. त्यामुळे मोबाइल चोरीची प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक आहे.

Web Title: Incidents of looting, including mobile theft, have increased in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.