झेंडूच्या शेतीतून दोन महिन्यांत दीड लाख रुपयांचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:11 AM2020-11-17T05:11:59+5:302020-11-17T05:12:06+5:30
शेतीवाडी : बोरगव्हाण येथील शेतकऱ्याचा आदर्श
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (जि. परभणी) : ‘विकेल तर पिकेल’ या संकल्पनेतून पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील एका २२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने झेंडूच्या शेतीतून सव्वादोन महिन्यांत १ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे शेत बांधावरुनच थेट बाजारपेठेत स्वत: फुलं विक्री करुन शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथील शेतकरी वैभव भगवानराव खुडे हा बी.कॉम. द्वितीय वर्षात शिक्षण घेतो. वडिलोपार्जित शेतीला मदत करुन तो शेतीत वेगवेगळे प्रयोग करतो. वैभवकडे बागायती १० एकर शेती आहे. यात मागील अनेक वर्षापासून वडील पारंपारिक पिके घेतात. मात्र पिकांवर केेलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही. त्यामुळे वैभव याने पारंपारिक पिकाला फाटा देत झेंडूची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५ सप्टेंबर २०२० रोजी १० गुंठे क्षेत्रावर ४ बाय २ अंतरावर कलकत्ता झेंडू वाणाच्या १३०० रोपांची लागवड केली. त्यानंतर अवघ्या १० हजार रुपयांच्या खर्चावर सव्वा दोन महिन्यात हे पीक बाजारात विक्री करण्यासाठी तयार झाले.
दसरा सणाच्या पूर्वसंध्येला त्याच्या शेतातून व्यापाऱ्याने करार करुन जागेवरच ८० रुपये किलो दराने झेंडूची खरेदी केली. १० क्विंटल फुले निघाल्याने वैभवला ८० हजार रुपयांचे उत्पन्न पदरात पडले.
पाथरीत स्टॉल लावून केली विक्री
nशुक्रवार व शनिवार या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वैभव खुडे याने पाथरी शहरातील बाजारात स्टॉल लावून झेंडूची विक्री केली. ६ क्विंटल फुलांची विक्री करुन प्रति किलो १४० ते दीडशे रुपयांचा भाव घेत ८५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. त्यामुळे झेंडूच्या शेतीतून अडीच महिन्यात दीड लाख रुपयांचा नफा या शेतकऱ्याने मिळविला आहे.