अनलॉकनंतर मराठवाड्यासाठी केवळ चारच रेल्वे गाड्या असल्याने प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 06:09 PM2020-11-27T18:09:37+5:302020-11-27T18:14:09+5:30
राज्य शासनाने राज्यात रेल्वे वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी आशा होती.
परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर दिवाळी सणासाठी सुरू केलेली नांदेड- पनवेल ही विशेष रेल्वेगाडीही बंद केली जाणार असून, केवळ तीन ते चार रेल्वे गाड्याच मराठवाड्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
राज्य शासनाने राज्यात रेल्वे वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी आशा होती. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड- पनवेल ही रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे काही दिवस मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वेसेवाही चालविण्यात आली. मात्र मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तर पनवेल एक्स्प्रेस २९ तारखेपर्यंतच धावणार आहे. त्यानंतर मात्र दिल्लीसाठी सचखंड एक्स्प्रेस, मुंबईसाठी नंदीग्राम एक्स्प्रेस आणि हैदराबादसाठी परभणी - हैदराबाद व औरंगाबाद- हैदराबाद या चारच रेल्वे गाड्या धावत आहेत.
या चारही गाड्यांना बहुतांश वेळा आरक्षण फुल्ल झालेले असते. त्यामुळे नांदेड, परभणी या स्थानकावरुन औरंगाबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण मिळत नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद, मनमाडपर्यंतच मराठवाड्यातून सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. मात्र अद्याप या सेवेला हिरवा झेंडा मिळाला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
२०० कि.मी.च्या निर्णयाचा फटका
रेल्वे विभागाने २०० कि.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्याच रेल्वे गाड्या सुरू करण्याचे धोरण ठरविले आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना मराठवाड्यातील गावे गाठण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधेचाच वापर करावा लागत आहे. मराठवाड्यातून औरंगाबाद येथे विविध कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्व सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.