जायकवाडी कालव्यांची वहनक्षमता वाढवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:42+5:302021-09-25T04:17:42+5:30
परभणी : मराठवाड्यातील जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची संगणकीय रचना आणि अत्याधुनिक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानानुसार रचना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ...
परभणी : मराठवाड्यातील जायकवाडीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची संगणकीय रचना आणि अत्याधुनिक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानानुसार रचना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने प्राधान्याने कामे करून सिंचनाचे क्षेत्र वाढविले जाणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खा. फौजिया खान, खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपूडकर, आ.डॉ. राहुल पाटील, आ. रत्नाकर गुट्टे, जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, कार्यकारी संचालक के.बी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता विनय शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, जायकवाडी कालव्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. त्याची सुधारणा करण्यात येणार असून, उच्च दर्जाची कामे केली जाणार आहेत. मराठवाड्यात होत असलेल्या पावसाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी कामांची आवश्यकता असेल, तेथे ती पूर्ण केली जातील. पालम तालुक्यातील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणीसाठ्यापैकी हक्काचा ३३ टक्के पाणीसाठा जिल्ह्यासाठी कायम राखीव ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. चाऱ्यांची तुटफूट व निर्माण झालेल्या अडथळ्यांची कामे तत्काळ हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रारंभी कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांची माहिती दिली. बैठकीस मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपकार्यकारी अभियंता प्रताप साेळंके यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.