'गाळप क्षमता वाढवा', ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाथरीत काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 06:15 PM2021-12-10T18:15:42+5:302021-12-10T18:18:01+5:30
या भागात जवळपास 20 हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे
पाथरी : रेणुका शुगर्स साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात यावी, लागवड करण्यात आलेल्या संपूर्ण उसाच्या नोंदी घेण्यात याव्यात त्याच बरोबर गत वर्षीच्या एफआरपी रक्कमेचा हिशोब देण्यात यावा, लिंबा कारखान्याने मापात पाप केले आहे त्याची चौकशी झाली पाहिजे या आणि इतर मागण्यांसाठी ऊस उत्पादक संघर्ष समिती किसान मोर्च्याच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 10 डिसेंबर रोजी येथील तहसील कार्यालया मोठा मोर्चा काढण्यात आला.
पाथरी सोनपेठ आणि मानवत या तीन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात मागील दोन महिन्यांपासून भाकप आणि ऊस उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या भागात जवळपास 20 हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस गाळपा अभावी शिल्लक राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे याच आंदोलनाचा भाग म्हणून 10 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या प्रांगणातुन हा मोर्चा निघाला मुख्य रस्त्याने सेलू कॉर्नर पर्यन्त आणि तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला या मोर्चात कॉम्रेड राजन क्षीरसागर, शिवाजी कदम, नवनाथ कोल्हे, विश्वनाथ थोरे ,ज्ञानेश्वर काळे, प्रशांत नखाते, कैलास लिपणे, श्रीनिवास वाकणकर , मुजाभाऊ लिपणे, नारायण दळवे, सुरेश नखाते, बाबा टेकाळे, साथीराम थोरे, सतोष डाके, ओमप्रकाश नखाते, तुकाराम शिंदे, विलास दळवे, तुळशीराम खेडेकर, बडे साहाब, सखाराम झुटे, सुरेश नखाते, दीपक वाळके, भारत गायकवाङ, राजेश ढगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लक्ष वेधले, तहसील कार्यालयासमोर विश्वनाथ थोरे, राजन क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.
आठ दिवसात प्रस्ताव सादर करा
या वेळी मार्गदर्शन करताना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आठ दिवसात रेणुका शुगर्स साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढण्यासाठी साखर आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले, आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी 27 डिसेंबर रोजी पाथरी येथे रस्तारोको आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.