पुण्या, मुंबईतून जिल्ह्यात वाढला कामगारांचा ओढा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:11+5:302021-04-10T04:17:11+5:30
परभणी : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे कामानिमित्त स्थलांतरित झालेले कामगार परत गावाकडे ...
परभणी : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे कामानिमित्त स्थलांतरित झालेले कामगार परत गावाकडे येत आहेत.
जिल्ह्यात आता वाहतुकीसाठी केवळ रेल्वेचाच पर्याय उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रेल्वेस्थानकावर जाऊन पाहणी केली तेव्हा रेल्वेने मोठ्या संख्येने कामगार जिल्ह्यात दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले, मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या शहरात झालेली आबाळ लक्षात घेता, कामगार आतापासूनच उपाययोजना करीत आहेत. गावाकडे परतणाऱ्या कामगारांची संख्या मोठी नसली तरी बहुतांश कामगार रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत आहेत. सचखंड एक्स्प्रेस तसेच पुणे आणि मुंबईकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना मागील काही दिवसांपासून गर्दी दिसून येत आहे. ऊसतोडीसाठी परजिल्ह्यात गेलेले कामगारही ट्रॅक्टरने जिल्ह्यात दाखल होत आहेत.
वसमत, जालना रस्त्यावर गर्दी
परभणी जिल्ह्यातून आणि परप्रांतातून मोठ्या संख्येने कामगार जिल्ह्यात दाखल होत आहेत. वसमत आणि जालना मार्गावर सर्वाधिक गर्दी असल्याचे दिसून येत आहे. दररोज किमान १०० ते १५० कामगार जिल्ह्यात दाखल होत आहेत.
सध्या जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ रेल्वेची सुविधाच सुरू आहे. त्यामुळे पुणे, मुंबई या भागांतून येणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवासी संख्या वाढली आहे. अनेक जण गावाचा रस्ता धरत आहेत.
मागील वर्षीही कामगार मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर हे कामगार परत कामाच्या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कामगारांचा ओढा कमी असला तरी दररोज रेल्वेने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे.