परभणी जिल्ह्यात कापूस, सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:25 AM2019-08-25T00:25:20+5:302019-08-25T00:25:54+5:30
पावसाचा ताण पडल्याने एकीकडे पाण्याअभावी सुकत असलेल्या जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असून, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे टाकले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: पावसाचा ताण पडल्याने एकीकडे पाण्याअभावी सुकत असलेल्या जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असून, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे टाकले आहे़
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मागील काही वर्षांपासून कापसाच्या बरोबरीने सोयाबीनचा पेरा घेतला जातो़ ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या दृष्टीने पैसा देणारी पिके आहेत़ त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत कापूस, सोयाबीनच्या वाढीसाठी शेतकरी अधिक दक्ष असतात़ यावर्षी पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्यामध्ये साधारणत: अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन आणि दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़ पावसाने ताण दिल्यामुळे ही दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच कोमेजून जाण्याच्या स्थितीत आहेत़ जिल्ह्यात काही भागात पडलेल्या पावसामुळे या पिकांना जीवदान तर मिळाले़ परंतु, ढगाळ वातावरण आणि पावसाचा ताण यामुळे किडीचा प्रादुर्भावही वाढला आहे़ कीड नियंत्रण करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहेत़ मात्र शेतकºयांनी शास्त्रीय दृष्टीकोणातून कीड व्यवस्थापन केले तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो़ या पार्श्वभूमीवर येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकºयांना कीड नियंत्रणाविषयी सल्ले दिले आहेत़
कोणत्या पिकावर कोणती कीड
जिल्ह्यामध्ये कपाशीच्या पिकावर प्रामुख्याने माव्याचा प्रादुर्भाव आढळत आहे़ काही भागात तुडतुडे व गुलाबी बोंडअळीच्या डोमकळ्या आढळल्या आहेत़ हवामान ढगाळ असल्यामुळे व कपाशीचे पीक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रिय झाल्याचे दिसत आहे़ मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात़ त्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे़ सोयाबीन पिकावर प्रामुख्याने चक्री भुंगा, कोंडीका तसेच पाने खाणाºया अळीचा प्रादुर्भाव आढळला आहे़
कपाशीसाठी काय करावे?
कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करून डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात, गुलाबी बोंडअळीसाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत, प्रती सापळा सरासरी ८ ते १० पतंग सतत दोन-तीन दिवस आढळून आल्यास ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी व योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी़ गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठ्या प्रमाणात गोळा करून नष्ट करण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत, उपलब्धतेप्रमाणे एकरी ३ ट्रायकोकार्ड पानाच्या खालच्या बाजुस लावावेत, तसेच इंग्रजी टी आकाराचे पक्षीथांबे हेक्टरी ४० या प्रमाणात लावावेत़ फुल किडीच्या व्यवस्थानासाठी निळे चिकट सापळे तर पांढºया माशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे लावावेत़
सोयाबीन पिकासाठी
सोयाबीन पिकामध्ये चक्री भुंगा, कोंडीका अळी, पाने खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरॅन ट्रानिलीप्रोल १८़५ एससी प्रति १० लिटर पाण्यात ४ मिली मिसळून फवारणी करावी तसेच फ्लूबेंडामाईड ३९़३५ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावे, थायामिथीझाम १२़६ टक्के अधिक लॅमडा साहॅलोथ्रीन ९़५ टक्के झेडसी प्रति ४ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ संजीव बंटेवाड, किटकशास्त्रज्ञ डॉ़ पुरुषोत्तम झंवर, डॉ़ अनंत बडगुजर, डॉ़ कृष्णा अंभोरे यांनी केले आहे़