पहिल्या लाटेत रोखलेल्या २१९ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:00+5:302021-04-29T04:13:00+5:30
परभणी : जिल्ह्यात पहिल्या लाटेमध्ये कोरोनामुक्त असलेल्या २१९ गावांमध्ये दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या ...
परभणी : जिल्ह्यात पहिल्या लाटेमध्ये कोरोनामुक्त असलेल्या २१९ गावांमध्ये दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या गावकऱ्यांचे नेमके चुकले काय? याचा शोध घेऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी पुन्हा निकराने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळात शहरी विभाग कोरोना रुग्णांमुळे त्रस्त असतानाच ग्रामीण भागातील नागरिकांनी मात्र कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्याने ३८४ गावांनी कोरोनाला गावापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते. बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक ग्रामस्थाला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आले होते. ग्रामस्थांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याला गावात प्रवेश देण्यात आला. या नियमांचे पालन कालांतराने झाले नाही. त्यामुळे अनेक गावांना आज कोरोनाने वेढले आहे.
गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३८४ गावांनी कोरोनाला आपल्या गावापासून दूर ठेवण्यात यश मिळवले होते; परंतु फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याने ३८४पैकी २१९ गावांमध्ये कोरोनाने प्रवेश मिळवला. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग जास्तीत जास्त गावांपर्यंत पोहोचला. त्यामुळे ज्या गावात कोरोनाने शिरकाव केला, तेथील गाव कारभाऱ्यांनी आता पहिल्यासारखी कडक बंधने पाळण्याची गरज आहे.