परभणीत कोरोनाचा शिरकाव; रुग्णांच्या खर्चापोटी पाच लाख रुपयांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 07:16 PM2020-07-12T19:16:32+5:302020-07-12T19:17:00+5:30
वाढत्या रुग्ण संख्येमुळे दंडाची रक्कम ही वाढण्याची शक्यता
गंगाखेड (परभणी ) : शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याने मुलाच्या लग्नाचे स्वागत समारंभ आयोजीत करून गर्दी जमा करत दाखविलेल्या थाटामुळे शहरात कोरोना विषाणूंचा शिरकाव होऊन स्वागत समारंभाला उपस्थित राहिलेल्या अनेकांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवज्ञा करून थाट दाखविणाऱ्या शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याविरुद्ध दि. ११ जुलै शनिवार रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत सात दिवसांच्या आत पाच लाख रुपये भरण्याची नोटीस तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी काढली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्ण संख्येमुळे दंडाची रक्कम ही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राधेश्याम रतनलाल भंडारी यांच्या मुलाचा विवाह जून महिन्यात २५ तारखेला लातूर येथे संपन्न झाल्यानंतर त्यांनी दि. २८ जून रोजी शहरातील स्वतःच्या जिनिंगवर मुलाच्या लग्नाचे स्वागत समारंभ आयोजीत करून गंगाखेड शहरासह तालुक्यातील व तालुक्याबाहेरील राजकिय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व्यापारी, बँकेचे वरीष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह महसूल प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करून आपला थाट दाखविला.
स्वागत समारंभ संपन्न झाल्याचे चार दिवसानंतर या व्यापाऱ्याच्या घरातील ६० वर्षीय महिला कोरोना बाधीत आल्याच्या पाठोपाठ त्याच्या घरातील अन्य सहा सदस्यांसह त्यांच्याकडे कामावर असलेल्यांचे व स्वागत समारंभाला हजेरी लावणाऱ्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचे स्वब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तसेच दिवसेंदिवस शहरातील कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमाना सक्तीने मनाई केलेली असतांना सुद्धा शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवज्ञा करून जिनिंग परिसरात स्वागत समारंभ आयोजीत केला.
यामुळे व्यापाऱ्याच्या घरातील एका व्यक्तीसह अन्य दहा जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याने स्वागत समारंभाच्या कार्यक्रमास हजर असलेल्यांचे विलगीकरण करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, स्वब नमुना घेऊन तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविणे, अँटीजेंट टेस्ट करणे, विलगीकरण केलेल्या व्यक्तींच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था करणे, शहरात कोरोना प्रभावीत व्यक्तींचे राहण्याचे ठिकाण प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून करणे, कोरोना बाधीत रुग्णांवर औषधोपचार करणे आदी बाबीवर शासनाचा लाखो रुपये खर्च होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघण करून स्वागत समारंभाचे आयोजन करणाऱ्या प्रतिष्ठित व्यापाऱ्यावर दि. ११ जुलै रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पाच लाख रुपये दंड सात दिवसांत भरण्याची नोटीस तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी काढली मात्र सदर व्यापारी शहरात नसल्याने अद्याप पर्यंत त्यास नोटीस तामील झाली नसल्याचे खात्री लायक वृत्त असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे दंडाची रक्कम ही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.