निम्न दुधनात ७ दलघमी पाण्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:51+5:302021-06-16T04:24:51+5:30
जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाणी येते. ८ जूनपासून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने, ...
जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाणी येते. ८ जूनपासून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने, दुधना प्रकल्पाच्या जलाशयात पाण्याची वेगाने आवक होत आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार वर्षांनंतर दुधना प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यानंतर, रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यातून तीन पाणी पाळ्या देण्यात आल्या, तसेच उन्हाळी पिकांना दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात आले होते, तसेच दुधना नदीकाठावरील गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने, निम्न दुधना प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठावरील ५० गावांची तहान भागली होती. दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून सेलू शहराला पाणीपुरवठा केला जातो. जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि शेकडो गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे दुधना प्रकल्पाच्या पाण्यावर जालना आणि परभणी जिल्हयातील शेकडो गावांची पाण्याची मदार आहे, तसेच सेलू, जिंतूर आणि परभणी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दुधनेच्या पाण्याचा आधार मिळतो. दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात दुधना प्रकल्पात पाण्याची आवक होते. मात्र, प्रथमच जून महिन्यात प्रकल्पात ६ दिवसांत ७ दलघमी पाणी आल्याने, यंदा ही प्रकल्प शंभर टक्के भरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पात ५३ टक्के जलसाठा
गतवर्षी निम्न दुधना प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा निर्माण झाला होता, परंतु रब्बी, उन्हाळी पिकांना पाणी देण्यात आले, तसेच दुधना नदीपात्र पाणी सोडण्यात आले. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा निम्म्यावर आला होता. जून महिन्यातच दुधनामध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत प्रकल्पात २३२.४८९ दलघमी एकूण जलसाठा आहे. त्यात १२९.८८९ दलघमी जिवंत पाणीसाठा असून जो की, ५३.६३ टक्के आहे.