'मनरेगाचे ई-मस्टर सुरू करा'; आंदोलकांनी पाथरी पंचायत समिती कार्यालयाला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 02:28 PM2023-04-10T14:28:24+5:302023-04-10T14:28:38+5:30
गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असे म्हणत आंदोलकांनी यावेळी पंचायत समितीच्या व्हरांड्यामध्ये ठिय्या मांडला
पाथरी (परभणी ): मनरेगांच्या कामांचे मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेले ई-मस्टर सुरु करण्याची मागणी करत संतप्त आंदोलकांनी आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाथरी पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकले.
पाथरी तालुक्यामध्ये मनरेगामधून सार्वजनिक कामांमध्ये वृक्ष लागवड, मातोश्री पानंद रस्ते इत्यादी कामांना प्रशासकीय मान्यता व त्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. यात 96 पांदण रस्ते 20 वृक्ष लागवड , तसेच 44 अंतर्गत रस्ते ही कामे मंजूर आहेत. परंतु, ऑक्टोबर महिन्यापासून अनेक कारणांनी पाथरी पंचायत समिती कार्यालयामधून ही मस्टर काढणे बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महत्त्वाचे प्रश्न असणाऱ्या कामांना अडथळा निर्माण झाला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाथरी पंचायत समिती कार्यालय गटात ही ई -मस्टर तात्काळ चालू करा या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयास टाळे ठोकले .यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलन मागणीवर ठाम होते.
दरम्यान, यावेळी पोलीस प्रशासनाकडून सपोनि बी.आर. बंदखडके यांनी आंदोलकांची समज काढली. त्यानंतर कार्यालयाला लावलेले कुलूप काढण्यात आले. परंतु मस्टर केव्हा चालू करणार? हे गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असे म्हणत आंदोलकांनी यावेळी पंचायत समितीच्या व्हरांड्यामध्ये ठिय्या मांडला होता. आंदोलनात माणिकआप्पा घुंबरे, रंगनाथ वाकणकर, पांडुरंग शिंदे, अविराज टाकळकर, महेश कोल्हे, रामचंद्र आम्ले, बापु कोल्हे, अमोल शिंदे, सुरेश नखाते, शरद कोल्हे, विजय कोल्हे, गणेश यादव, विष्णू उगले, विजय नखाते आदींचा सहभाग होता.