१९८ बालकांच्या मदतीसाठी टास्क फोर्स घेणार पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:28+5:302021-06-30T04:12:28+5:30
जिल्ह्यात १९८ बालकांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत. त्यात २० बालकांच्या मातेचा मृत्यू झाला आहे. या बालकांना मदत करण्याच्या उद्देशाने ...
जिल्ह्यात १९८ बालकांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत. त्यात २० बालकांच्या मातेचा मृत्यू झाला आहे. या बालकांना मदत करण्याच्या उद्देशाने जिल्हा टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या टास्क फोर्सच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. त्यात पालक गमावलेल्या बालकांना मदत करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. या बालकांची माहिती एनसीपीसीआर पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, गुगल शिटच्या माध्यमातून ही माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात आली आहे. कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांचे शैक्षणिक प्रश्न, त्यांच्या संगोपनाचा प्रश्न सोडविण्यासाठी टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा होऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत असलेल्या योजनांतून या बालकांना मदत देण्याचा प्रयत्न आता केला जात आहे.
पतीच्या निधनामुळे ८४ महिला विधवा
कोरोनाने पतीचे निधन झाल्याने ८४ महिला विधवा झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. निराधार झालेल्या या महिलांना शासनाच्या विविध योजनांतून मदत करण्याचा विचारविनिमय सध्या सुरू आहे. त्यात महसूल प्रशासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या योजनांमधून कशा पद्धतीने मदत केली जाऊ शकते, याविषयी टास्क फोर्स विचार करीत असून, पात्र महिलांना मदत दिली जाणार आहे.
द्विपालक गमावलेली चार बालके
कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या चार बालकांची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यातील एक बालक हा १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. या बालकाला शैक्षणिक आणि संगोपनाची मदत देण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केला जात आहे. बालसंगोपनगृह आणि बालगृह अशा दोन योजना जिल्हा महिला व बाल कल्याण विभागातून राबविल्या जातात. या योजनेतून बालकास मदत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाने पालक गमावलेले बालक
परभणी शहर : ३२
परभणी ग्रामीण : २५
पूर्णा : १८
गंगाखेड : २२
पालम : १८
सोनपेठ : २०
सेलू : १६
मानवत : ११
जिंतूर : २१
पाथरी : १५
०६ ते ६ वयोगटातील ४५ बालके
कोरोनाने पालक गमावलेल्या १९८ बालकांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील ४५ बालकांचा समावेश आहे. त्यात २६ मुली आणि १९ मुलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ६ ते १८ वर्षे वयोगटातील ११२ आणि १८ वर्षांपुढील ४१ बालकांचा समावेश आहे.