मराठवाड्यावर अन्याय ! नांदेड विभागात ७३७ कि.मी. रेल्वेमार्ग अजूनही एकेरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 03:02 PM2021-12-14T15:02:41+5:302021-12-14T15:05:02+5:30
नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत.
- राजन मंगरूळकर
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड विभागांतर्गत वाहतूक सुरू असलेल्या रेल्वेमार्गांपैकी सद्य:स्थितीत केवळ २ टप्प्यांची वाहतूक दुहेरीकरणाद्वारे सुरू आहे. याच विभागातील ८२० कि.मी.च्या रेल्वे मार्गापैकी सध्या ७३७ किलोमीटरच्या मार्गाची वाटचाल एकेरी मार्गानेच सुरू आहे. नांदेड विभागाच्या २०१८-१९ मधील लाइन कपॅसिटी युटिलायझेशनच्या अहवालात ही बाब स्पष्ट केली आहे. त्यात मागील ३ वर्षांत फारसा बदल झालेला नाही, हेही विशेष.
नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत. या सर्व मार्गांचे ब्रॉडगेज पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ २ सेक्शनमधील वाहतूक दुहेरीकरण मार्गाने सुरू आहे. उर्वरित सात सेक्शनमधील ७३७ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाची वाटचाल एकेरी मार्गानेच सुरू आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणताही नवा मार्ग किंवा दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव सध्या तरी प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेला नाही. या मार्गांवर सुरू असलेल्या प्रवासी, मालवाहतुकीद्वारे मार्गावर किती वाहतूक आहे, त्याची टक्केवारी किती, याचा अहवाल २०१८-१९ मध्ये प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.
दुहेरीकरणामुळे वाहतूक वाढल्याचे होते सिद्ध
सात टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या किलोमीटरसाठी दाखविण्यात आलेल्या मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण कमी-अधिक असून, या मार्गांचा विचार दुहेरीकरणाच्या बाबतीत केला जात नसल्याचे दिसून येते. दुहेरीकरण केल्याने २ टप्प्यांतील वाहतूक ११० ते १२० टक्के सुरू असल्याचे आकडेवारी सांगते, तर बाकी ठिकाणाहून असलेली अधिकची प्रवासी संख्या आणि उत्पन्न याचा विचार करून तेथील सरासरी ८० टक्के वाहतुकीला दुहेरीकरणातून का डावलले जात आहे.
८३ कि.मी.वर १२० टक्के वाहतुकीचा भार
परभणी-पूर्णा २९ कि.मी. व पूर्णा-मुदखेड ५३ कि.मी. अशा एकूण ८३ कि.मी.च्या मार्गावर ११० ते १२० टक्के वाहतुकीचा भार आहे, तर त्यावर धावणाऱ्या रेल्वेचे एका दिवसाचे प्रमाण २६.५ एवढे आहे, तर उर्वरित ७ टप्प्यांतील एकेरी मार्गावर ८० टक्के सरासरी वाहतुकीचा भार असून, तेथे सरासरी १५ ते १८ रेल्वे दिवसाला धावतात, असे अहवाल सांगतो. विशेष म्हणजे, विभागातील सर्व रेल्वे नांदेडहून सुटतात. त्या दक्षिण भारत, उत्तर भारत यासह अन्य भागांत परभणी, जालना, परळी, औरंगाबाद, मनमाडमार्गेच जातात. मग परभणीच्या पुढे वाहतूक कमी का होते, या मार्गाचे दुहेरीकरण केल्यास येथील मार्गावरही वाहतूक वाढण्यास मदत होऊ शकते.
सेक्शन कि.मी.चा मार्ग रेल्वेचे प्रमाण लाइनवरील वाहतुकीचे प्रमाण (टक्केवारी)
मनमाड-औरंगाबाद ११३ १८.७ ८५
औरंगाबाद-जालना ६२ १७.७ ८०
जालना-परभणी ११५ १७ ७६
परभणी-पूर्णा २९ २५.६ ११६
परभणी-परळी ६४ १२ ५५
पूर्णा-मुदखेड ५३ २६.५ १२०
मुदखेड-आदिलाबाद १६२ ६.५ ४१
आदिलाबाद-पिंपळकुटी २१ २ १३
पूर्णा-अकोला २१० १०.१ ४६