भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने परभणी जिल्ह्यावर अन्याय - खासदार जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 05:45 PM2017-12-19T17:45:30+5:302017-12-19T18:21:30+5:30
जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यातूनच विदर्भ - मराठवाड्याच्या विशेष योजनेच्या पॅकेजमधून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे असा सणसणीत आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज केला. ते शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या महा जन मोर्चाचे नेतृत्व करताना बोलत होते.
परभणी : जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यातूनच विदर्भ - मराठवाड्याच्या विशेष योजनेच्या पॅकेजमधून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे असा सणसणीत आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज केला. ते शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या महा जन मोर्चाचे नेतृत्व करताना बोलत होते.
शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १ वाजेच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. शेतकर्यांच्या प्रश्नांबरोबरच जिल्ह्यातील अवैध धंदे, व्यापार्यांचा एलबीटी प्रश्न, महापालिकेने वाढविलेली घरपट्टी, जिल्ह्यातील ठप्प झालेले रोजगार हमी योजनेची कामे अशा विविध समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आली.
भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने दुजाभाव
खा. बंडू जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर झालेल्या सभेतील भाषणात सांगितले कि, शेतकर्यांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रशासनाच्याविरुद्ध हा मोर्चा आहे. राज्य शासनाने विशेष योजनांसाठी पॅकेज जाहीर केले. विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्याला हे पॅकेज देण्यात आले. मात्र, परभणी जिल्ह्याला यातून वगळण्यात आले. जिल्ह्यात भाजपाचा आमदार, खासदार नसल्याने दुजाभाव केला जात आहे. हे पैसे मिळाले असते तर जिल्ह्यातील ३ हजार वीज जोडण्या सुरु झाल्या असत्या.
ढोल-ताशाच्या गजरात निघाला मोर्चा
शनिवार बाजार येथून खा. बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशाच्या गजरात हा मोर्चा निघाला. शनिवार बाजार, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. भगवे रुमाल आणि भगवे झेंडे घेऊन जिल्हाभरातील शिवसैैनिक व शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, खा.बंडू जाधव, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ.संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, प्रभाकर वाघीकर, संतोष मुरकुटे, राम खराबे, विष्णू मांडे, बाळासाहेब जाधव, अतुल सरोदे, संजय सारणीकर, माणिक पोंढे आदींसह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.
प्रारंभी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आपल्या भाषणांमधून भाजप सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनावर तोफ डागली. यावेळी राम पाटील, जिल्हाप्रमुख कच्छवे, आणेराव, डॉ.नावंदर यांची भाषणे झाली.