खोडवेकर यांची ग्रामविकास विभागाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:54+5:302021-01-17T04:15:54+5:30
परभणी जिल्ह्यात ४ वर्षांपूर्वी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत वैयक्तीक व सार्वजनिक शौचालय उभारणीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला ...
परभणी जिल्ह्यात ४ वर्षांपूर्वी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत वैयक्तीक व सार्वजनिक शौचालय उभारणीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला होता. या निधीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची बाब समोर आली होती.
या प्रकरणी तक्रारीनंतर शासनाकडून काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या; परंतु ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे आ. बाबाजानी दुर्राणी यांनी राज्य शासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यात ४ वर्षांपूर्वी करण्यात आलेली शौचालयाची कामे, वितरित केलेला निधी, अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी केलेला गैरव्यवहार, आदी प्रकरणाची औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानुसार जि. प. चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध सामान्य प्रशासन विभागाच्या ८ एप्रिल २०१९ च्या पत्राद्वारे दोषारोप पत्र बजावून सुरू केलेली विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे का? तसेच या अनुषंगाने काय कारवाई करण्यात आली आहे? असेही आ. दुर्राणी यांनी त्यांच्या पत्रात म्हटले होत. या अनुषंगाने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखी उत्तर दिले आहे, त्यात म्हटले आहे की, आलेल्या तक्रारीवरून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली आहे. आयुक्तांच्या अहवालानुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांच्या विरुद्ध सामान्य प्रशासन विभाग व ग्रामीण विकास विभाग यांच्याकडून विभागीय चौकशीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे खोडवेकर यांची परभणीतून ४ वर्षांपूर्वी बदली झाली असली तरी त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कायम आहे.