पाथरी तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 05:00 PM2018-02-16T17:00:48+5:302018-02-16T17:04:01+5:30
रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न माजलगाव पोलिसांनी उघड केल्यानंतर झालेल्या चौकशीत सदरील धान्य पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४ रेशन दुकानांचे पंचनामे करुन चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार वासुदेव शिंदे संबंधितांना दिले आहेत.
पाथरी (परभणी ) : रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न माजलगाव पोलिसांनी उघड केल्यानंतर झालेल्या चौकशीत सदरील धान्य पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील १४ रेशन दुकानांचे पंचनामे करुन चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार वासुदेव शिंदे संबंधितांना दिले आहेत.
राज्य शासनाने रेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गोदामांऐवजी थेट रेशन दुकानदारांना धान्य पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणारी लॉबी कायम सक्रिय असल्याचे सातत्याने उघड होत आहे. त् १३ फेब्रुवारी रोजी माजलगाव पोलिसांनी पाथरी येथून आलेल्या एका टेंपोतील २०० क्विंटल रेशनचे धान्य ताब्यात घेतले होते. यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत हे धान्य पाथरी तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले.
माजलगावला रेशनच्या धान्याचा टेंपो पकडताच पाथरी येथील पुरवठा विभागाने धान्याचे परमीट वाटप केलेल्या दुकानदारांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये १४ रेशन दुकानदारांचा समावेश आहे. या सर्व दुकानदारांच्या चौकशीचेही आदेश तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पाथरी येथील पुरवठा विभागाचा गोदाम कुलूपबंद होता. गोदाम बंद करुन गोदामपाल कुठे गेले होते, हे मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिकृत टेंपोतूनच नेले धान्य
थेट द्वारपोच योजनेअंतर्गत पाथरी तालुक्यातील ७८ दुकानांमध्ये रेशनचे धान्य वितरित करण्यासाठी ६ टेंपो नियुक्त करण्यात आले होते. सदरील टेंपोंचे नंबर पुरवठा विभागाकडे उपलब्ध आहेत. या टेंपोवर स्पष्टपणे निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था महाराष्ट्र शासन असे नाव लिहिलेले आहे. त्याच टेंपोमधून माजलगाव पोलिसांनी पकडलेला रेशनचा माल नेण्यात येत होता. विशेष म्हणजे धान्य वितरण प्रणालीचे उद्घाटन डिसेंबरमध्ये याच टेंपोसमोर नारळ फोडून पुरवठा विभागाकडून करण्यात आले होते आणि तोच टेंपो आता माजलगाव पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांच्या ताब्यात आहे.
जीपीएस यंत्रणा ठरली कुचकामी
रेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी धान्य वाहून नेणार्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु, ही जीपीएस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे या घटनेत दिसून येत आहे. पाथरीचा टेंपो माजलगाव येथून जात असताना संबंधित जीपीएस यंत्रणा तपासणी करणार्यांना कसे काय दिसले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी पूर्णा येथे रेशनचे धान्य वितरित करणारा टेंपो वसमत येथे असल्याचे आढळले होते. चौकशीअंती तो रिकामा असल्याचे सांगण्यात आले होते.
कारवाई केली जाईल
पाथरी येथील १४ दुकानदारांना परमीट दिले होते. त्यांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिल्या आहेत. आलेल्या अहवालानुसार कारवाई केली जाईल.
-निलेश पळसकर, नायब तहसीलदार, पाथरी