मध्यवर्ती बँक ऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत पगार करण्यासाठी घोडे अडले कुठे, तुम्हीच सांगा साहेब!
By मारोती जुंबडे | Published: August 21, 2023 05:10 PM2023-08-21T17:10:37+5:302023-08-21T17:10:54+5:30
राष्ट्रीयकृत बँकेत शिक्षकांचे खाते उघडावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले असतानाही वेतन अधीक्षकांकडून टाळाटाळ केली जात आहे.
परभणी: जिल्ह्यातील अनुदानित व अंशत अनुदानित शाळेतील शिक्षकांचे मासिक वेतन मध्यवर्ती बँक ऐवजी राष्ट्रीयकृत बँकेत समायोजित करावेत, यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन साकडे घातले.
जिल्ह्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे मासिक वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते. परिणामी, राष्ट्रीयकृत बँकांच्या सुविधा पासून हे शिक्षक वंचित राहत आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी व संचालक यांनी तत्काळ राष्ट्रीयकृत बँकेत शिक्षकांचे खाते उघडावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले असतानाही वेतन अधीक्षकांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे साहेब आमचे खाते मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँकेत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांपासून आम्ही वंचित आहोत. परिणामी, आमचे मोठे नुकसान होत आहे.
राष्ट्रीयकृत बँकांकडून ४ लाखांपर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज घेण्यात येत नाही. त्याचबरोबर बँक लोन प्रोसेसिंग शुल्कावर ५० टक्के सूट मिळते. हे मध्यवर्ती बँकेत मिळत नाही. त्यामुळे आमचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत समायोजित करावेत, असे साकडे मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे घातले आहे. यावेळी यशवंत मकरंद, एम. के. शिंदे, एस.बी. ढगे, एस. व्ही. सावळे, ए. बी. खेबाळे, एम.जी. मासुळे, जी.डी. लांबडे, एम.जी. शेवाळे आदींचीसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.