जिल्ह्यात वाढली उन्हाची तीव्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:52+5:302021-01-13T04:41:52+5:30
वाहनतळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय परभणी : येथील बसस्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानकावरील मोकळ्या जागेत कुठेही वाहने ...
वाहनतळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय
परभणी : येथील बसस्थानक परिसरात वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानकावरील मोकळ्या जागेत कुठेही वाहने उभी केली जात आहेत. परिणामी, स्थानकातून बस बाहेर काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. सध्या बसस्थानक भागात नवीन बसपोर्टची इमारत उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी जुनी इमारत पाडल्याने समस्या वाढली आहे.
वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा
परभणी : शहरात जागोजागी वाहतुकीच्या नियमांचा बोजवारा उडविला जात आहे. सर्रास नियम मोडत वाहने चालविली जात असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. विरुद्ध मार्गाने वाहने चालविणे, नो पार्किंगच्या जागेत वाहन उभे करणे त्याचप्रमाणे तिबल सीट वाहन चालविले जात आहे. वाहतूक शाखेने याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गहू, हरभऱ्याचे पीक जोमात
परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिके बहरली आहेत. यावर्षी गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांचे क्षेत्र वाढले असून, नियमित पाणी उपलब्ध होत असल्याने दोन्ही पिकांची वाढ समाधानकारक आहे. त्यातच जायकवाडी आणि निम्न दुधना या दोन्ही प्रकल्पाच्या कालव्यांना पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची समस्या दूर झाली आहे.
शनिवार बाजारच्या जागेचा प्रश्न खितपत
परभणी : येथील शनिवार बाजार इतर ठिकाणी भरविण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला आहे. मात्र, अद्यापही या बाजारासाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पूर्वीच्याच जागेवर हा बाजार भरविला जात असून, प्रत्येक शनिवारी नानलपेठ कॉर्नर भागात वाहतुकीचा खोळंबा होत आहे,
मोंढा बाजारपेठेत वाढल्या असुविधा
परभणी : शहरातील मोंढा बाजारपेठेत शेतकऱ्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठेतील रस्त्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. बाजार समितीच्या तीन बाजूंचे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. बाजार समिती प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
उड्डाणपुलाचे काम संथगतीने
परभणी : शहरातील रेल्वेस्थानकालगत विद्यापीठ गेटवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. या कामामुळे विद्यापीठ गेटवरील रस्त्या दोन महिन्यांपासून बंद ठेवला आहे. या पुलाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे,