आंतरजिल्हा जिल्ह्यांतर्गत बस वाहतूक उद्यापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:36+5:302021-03-21T04:16:36+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २२ मार्चपासून आंतर जिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत राज्य मार्ग परिवहन महामंडळ ...
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २२ मार्चपासून आंतर जिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच खासगी बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेतला आहे.
जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत वेगवेगळे उपाय राबविले. सद्य:स्थितीला बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील बसस्थानकावर पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांची एकाच ठिकाणी गर्दी होत आहे. खासगी वाहनांमधूनही नागरिक वाहतूक करीत गर्दी करीत प्रवास करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील आंतर जिल्हा व जिल्ह्यांतर्गत एसटी महामंडळाची बस सेवा तसेच खासगी बसमधून होणारी वाहतूक २२ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बससेवा आणि खासगी वाहतूक बंद झाल्याने या ठिकाणाहून होणारी प्रवाशांची वाहतूक थांबणार आहे. उद्या, सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
चहा स्टॉल, हॉटेल्सही केले बंद
जिल्ह्यात चहा स्टॉल, पानपट्टी आणि हॉटेल्सवर नागरिकांची गर्दी होत आहे. या ठिकाणाहून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हॉटेल्स आणि चहा स्टॉल्सवरील गर्दीला नियंत्रित करण्यासाठी २२ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील चहा स्टाॅल्स, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल्स व लॉन बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक, महानगरपालिकेचे आयुक्त आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांवर देण्यात आली आहे. चहा स्टॉल, हॉटेलचालकांना योग्य ती खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनवून केवळ पार्सल स्वरूपात विक्री करण्याची आणि वितरित करण्याची परवानगी मात्र देण्यात आली आहे.