International Yoga Day 2018 : परभणीत जागतिक योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांची योगासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:07 PM2018-06-21T13:07:28+5:302018-06-21T13:27:05+5:30
जिल्हा स्टेडियम मैदानावर आज सकाळी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही योगासने करुन योग दिन साजरा केला.
परभणी : जिल्हा स्टेडियम मैदानावर आज सकाळी जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही योगासने करुन योग दिन साजरा केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील जिल्हा स्टेडियम मैदानावर गुरुवारी योगासन व प्रामायाम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास महापौर मीनाताई वरपूडकर यांच्यासह जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, विश्वंभर गावंडे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ, आशा गरुड आदींच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाला प्रारंभ झाला.
शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे सादरीकरण केले. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनीही योगासने केली. निरायम योग प्रसार व संशोधन केंद्राच्या योग साधकांनी योगासनांची शास्त्रशुद्ध माहिती उपस्थितांना दिली. कृष्णा कवडी, बाळासाहेब सामाले, सुभाष जावळे यांनी या कामी पुढाकार घेतला.
रॅलीद्वारे जनजागृती
जिल्हा स्टेडियम मैदानावर योगासने केल्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून रॅली काढली. हातात फलके घेऊन योग, प्राणायांचे महत्त्व शहरवासियांना पटवून देण्यात आले. जिल्हा स्टेडियमपासून निघालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, विसावा कॉर्नर, नारायण चाळ, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ मार्गे निघून वैष्णवी मंगल कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप झाला.
International Yoga Day 2018 LIVE : परभणी जिल्हा स्टेडियम येथे आज सकाळी विद्यार्थ्यांसह अधिकाऱ्यांनी योगासने करत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन. #InternationalYogaDaypic.twitter.com/K3G44Zlglo
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) June 21, 2018
पोलीस मुख्यालयात कार्यक्रम
नानलपेठ भागातील पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी योगासनांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप झळके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, संजय हिबारे, अशोक घोरबांड, रामराव गाडेकर, नृसिंह ठाकूर यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. डॉ.रवि भंडारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना योगासनांविषयी मार्गदर्शन केले.
ठिकठिकाणी योग दिन उत्साहात
गुरुवारी जिल्हाभरात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासह सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला.