आंतरराज्य गुन्हेगारास पाठलाग करून पकडले; २० गुन्ह्यांची झाली उकल

By राजन मगरुळकर | Published: June 27, 2023 07:06 PM2023-06-27T19:06:02+5:302023-06-27T19:06:31+5:30

साथीदारांसह मिळून जवळपास २० ठिकाणच्या गुन्ह्याची कबुली दिली.

Interstate criminal chased and apprehended; 20 crimes were solved | आंतरराज्य गुन्हेगारास पाठलाग करून पकडले; २० गुन्ह्यांची झाली उकल

आंतरराज्य गुन्हेगारास पाठलाग करून पकडले; २० गुन्ह्यांची झाली उकल

googlenewsNext

परभणी : हायवा, टिप्पर, चारचाकी वाहने चोरणारा आंतरराज्य गुन्हेगारास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मानवत तहसीलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेत शिवारातून पाठलाग करुन ताब्यात घेतला. गुन्हेगाराचे वाहन बंद पडल्याने त्याने पोलिसांना चकमा देत पळ काढला. अखेर त्यास मानवत शेत शिवारातून ताब्यात घेतले. चौकशीत जवळपास २० गुन्ह्यांची उकल करण्यास पोलीसांना यश आले आहे.

जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यातील वाहन चोरीबाबत तपासासाठी व आरोपी शोधासाठी जिल्हा पोलीस दलाने तीन स्वतंत्र पथके तयार केली होती. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, साईनाथ पूयड, मारुती चव्हाण यांचे पथक मानवत, सेलू, पाथरी हद्दीत गस्त घालत होते. रविवारी माहितीवरून विविध गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हा (एमएच १२ जीआर ९९९५) या कारमधून मानवत ते पाथरी जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करत असल्याचे पथकाला समजले. पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, विलास सातपुते, रवीकुमार जाधव, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, निलेश परसोडे यांनी हात दाखवून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सदरील वाहन जोरात चालवून पाथरी ते मानवत रस्त्यावर मानवत तहसील कार्यालयाच्या पाठीमागे पडीक शेत शिवारामध्ये चालकाने नेले. हे वाहन आडमार्गाने व शेतातील धुऱ्याच्या खड्ड्याने जाताना अर्ध्या वाटेतच बंद पडले. येथे संबंधित चालक वाहून सोडून पोलिसांना चकमा देत पळाला. त्याचा पाठलाग पथकाने केला. मानवत शेत शिवारात दबा धरून बसलेल्या आरोपी विष्णू आकात यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील वाहन चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह मिळून जवळपास २० ठिकाणच्या गुन्ह्याची कबुली दिली. यातील विविध गुन्हे सदरील आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या ठिकाणचे गुन्हे केल्याची कबुली
मानवत चार, पालम एक, सेलू एक, सोलापूर जिल्ह्यातील विजापूर नाका एक, रायगड जिल्ह्यातील महाड एक, नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ एक, बीड जिल्ह्यातील केज एक, पुणे एक, तेलंगणा राज्यातील बासर एक, नांदेड शहरातील विमानतळ एक, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव एक, जालना जिल्ह्यातील घनसावंगी एक. बीड चकलंबा एक, पाथरी, रेणापूर, औंढा, हट्टा येथील एक. संबंधित मुख्य आरोपी विष्णू रामभाऊ आकात (रा. सातोना, ता.परतुर) याच्यासह अन्य साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. यात चोरचाकी, हायवा, टिप्पर यासह अन्य काही वाहने चोरी केल्याचे प्रकार घडले आहेत. आरोपी विष्णू आकात हा वरील सर्व गुन्ह्यात निष्पन्न झाला असून त्याच्याकडून परभणी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Interstate criminal chased and apprehended; 20 crimes were solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.