जिल्ह्यात शुक्रवारी ८९० जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:25+5:302021-01-03T04:18:25+5:30
३५०० जणांचे अहवाल प्रलंबित परभणी : कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणीअंतर्गत स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याअंतर्गत ...
३५०० जणांचे अहवाल प्रलंबित
परभणी : कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणीअंतर्गत स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याअंतर्गत ३ हजार ५०० स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. त्यामुळे हा अहवाल कधी येतो, याकडे संबंधित नागरिकांचे लक्ष लागले आहे.
होम आयसोलेशनमध्ये ४९ जणांवर उपचार
परभणी : आरोग्य विभागाने दिलेल्या सवलतीनुसार, कोरोनाबाधित झालेले ४९ रुग्ण सद्यस्थितीत होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी त्यांना या अनुषंगाने मार्गदर्शन करीत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
१ हजार ६१३ बेड जिल्ह्यात रिक्त
परभणी : कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील विविध खासगी व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी १ हजार ७०७ बेडची व्यवस्था करण्यात आली होती. त्यापैकी १ हजार ६१३ बेड सद्यस्थितीत रिक्त असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
८४ हजार रुग्णांची आतापर्यंत तपासणी
परभणी : कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने आतापर्यंत ८४ हजार ३२६ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २९ हजार १४७ जणांची आरटीपीसीआर चाचणी करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले. तर ५५ हजार १७९ जणांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७ हजार ४१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
परभणी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान- २०२०-२१ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कंदवर्गीय फुले, आंबा, संत्री, मोसंबी लागवड, शेडनेट हाऊस, हरितगृह, भाजीपाला लागवड आदींसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आळसे यांनी केले आहे.