परभणी महापालिकेचे दुर्लक्ष: नालीतील पाणी मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:41 PM2018-08-31T23:41:02+5:302018-08-31T23:42:03+5:30
शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले तुडूंब भरल्याने या नाल्यातील पाणी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट रस्त्यावरुन वाहू लागले. त्यामुळे या रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले तुडूंब भरल्याने या नाल्यातील पाणी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेट रस्त्यावरुन वाहू लागले. त्यामुळे या रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागल्याचे दिसून आले.
परभणी शहरातील नगरपालिकेचे रुपांतर सात वर्षापूर्वी महानगरपालिकेत झाले. शहरातील रस्ते, नाल्या, वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण या मुलभूत सुविधांची गरज महापालिका प्रशासन पूर्ण करेल, अशी अपेक्षा शहरवासियांना होती. या मुलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी सात वर्षामध्ये महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग केला; परंतु, सद्यस्थितीत रस्ते प्रभाग समिती अ, ब व क या तिही समित्यांपैकी बहुतांश रस्त्यावरुन नागरिकांना आजही ये-जा करण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यानंतर राहटी बंधारा व निम्न दुधना प्रकल्प तुडूंब भरले असतानाही शहरवासियांना पाण्यासाठी १२ ते १५ दिवस वाट पहावी लागते. शिक्षणाच्या बाबतीत तर महानगरपालिकेकडे असणाºया शाळा लयास गेल्या आहेत. या शाळेतील शिक्षकांना १२ महिन्यांपासून मनपाकडून पगारच देण्यात आलेला नाही. शहरातील प्रत्येक प्रभागातील नाल्या दुरुस्ती व नवीन तयार करण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो; परंतु, शहराच्या परिस्थितीमध्ये कोणताच बदल सध्या तरी दिसून येत नाही. शहरातील शिवाजी चौक परिसरातील मुख्य बाजारपेठेतील नाले शुक्रवारी सकाळीच तुडूंब भरुन वाहू लागले. या नाल्यातील पाणी रस्त्यावरुन वाहत होते. या परिसरात कापड दुकाने व बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते; परंतु, ३१ आॅगस्ट रोजी सकाळी या रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच मार्गस्थ व्हावे लागले; याकडे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी तरी प्रयत्न करावेत, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.
मनपाच्या बैठका नावालाच
महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या व नगरसेवकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व सुविधा पुरविण्यासाठी सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठका आयोजित करण्यात येतात. या बैठकांमध्ये मनपाकडून करण्यात आलेली कामे व नागरिकांना पुरविण्यात येणाºया सुविधा व अडीअडचणी संदर्भात मोठी चर्चा होते; परंतु, या बैठका संपल्याच्या नंतर नागरिकांना सोयी- सुविधा पुरविण्यासाठी कोणतेच ठोस पाऊले उचलण्यात येत नाहीत. त्यामुळे सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठका नावालाच होतात का? असा प्रश्न शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.