रेल्वेचे आयसोलाशन कोच तयार, प्रशासनाची मागणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:53+5:302021-04-27T04:17:53+5:30
देशात कोरोनाची पहिली लाट येताच केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने झोनच्या ठिकाणी रेल्वे डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कोचमध्ये केले. दक्षिण मध्य ...
देशात कोरोनाची पहिली लाट येताच केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने झोनच्या ठिकाणी रेल्वे डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कोचमध्ये केले. दक्षिण मध्य रेल्वेलाही तशा सूचना प्राप्त होताच मागील वर्षी नांदेड येथे या विभागातील परभणी, पूर्णासह जालना, औरंगाबाद व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अतिरिक्त बेडची सोय व्हावी, यासाठी २० आयसोलेशन कोचची निर्मिती केली. यासाठी लागणारी यंत्रणा तेथे कार्यान्वित केली. नांदेड येथे डीआरएम कार्यालय असल्याने व तेथे रेल्वेचे स्वतंत्र रुग्णालय असल्याने कोच तयार करुन ठेवले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाने अद्याप तशी मागणी केलेली नाही.
असे आहेत कोच
नांदेड रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या अतिरिक्त डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कोचमध्ये केले आहे. २० कोचमध्ये आयसोलेशन तयार केले आहे. यात बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. एका कोचमध्ये ९ कम्पार्टमेंट आहेत. एका कम्पार्टमेंटमध्ये राज्य शासनाने त्यांच्या गरजेनुसार २ किंवा ३ बेड ठेवल्यास एका कोचमध्ये साधारण ३०, तर एकूण २० कोचमध्ये मिळून ५०० ते ६०० बेड उपलब्ध होऊ शकतात.
स्थानिक प्रशासनाचे पत्रच नाही
नांदेड विभागातील ज्या जिल्ह्याची आयसोलेशन कोचची मागणी असेल तेथून जिल्हाधिकारी व राज्य शासनाच्या यंत्रणेने पत्राद्वारे कळविल्यास असे कोच पाठविता येतात. पण, अद्याप तशी मागणी आलेली नाही. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची आरक्षण तपासणी, मास्क घातले की नाही, याची तपासणी रेल्वे विभाग करत आहे. तसेच उद्घोषणा, पॅम्पलेटद्वारे जगजागृती केली जात आहे.
- राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, नांदेड.
परभणीत केवळ सचखंड रेल्वेची तपासणी
दिल्लीहून येणाऱ्या सचखंड रेल्वेतील प्रवाशांची तपासणी सध्या स्थानिक प्रशासन करत आहे. येथे अँटिजेन चाचणी केली जात आहे. याशिवाय अन्य रेल्वेची तपासणी केली जात नाही.
वाढती रुग्णसंख्या पाहता मागणीची गरज
परभणी जिल्ह्यात दररोजची वाढती रुग्णसंख्या पाहता येथील प्रशासनाकडे असलेल्या बेडमध्ये अतिरिक्त बेडची सोय व्हावी, याकरिता आयसोलेशन कोचची मागणी जिल्हा प्रशासनाने रेल्वेच्या विभागाकडे करणे गरजेचे आहे.