शेतात जाणे अन् पुलाचे काम करणेही अवघड, अखेर ढालेगाव बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:06 PM2023-03-02T12:06:59+5:302023-03-02T12:09:17+5:30
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गोपेगावजवळील पुलाचे काम करण्यासाठी ढालेगाव बंधाऱ्याच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली
- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी ) : गोदावरी नदीच्या काठावरील गोपेगाव जवळील पूलाला ढालेगाव बंधाऱ्याचे बॅकवॉटरचे पाणी साचून राहात असल्याने या पुलावरील वाहतूक बंद पडली होती. पुलाचे काम करण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. यानुसार 1 मार्च रोजी रात्री 9 वाजता ढालेगाव बंधाऱ्यातून तब्बल 3 .68 दलमी पाण्याचा विसर्ग खालच्या बंधाऱ्यात करण्यात आला आहे.
पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील बंधाऱ्याचे बॅकवॉटर गोदावरी नदीच्या काठावर जवळपास 22 किमी आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन पाणी अडविण्यात आल्यानंतर बॅक वॉटरच्या पाण्याचा फटका गोपेगाव आणि मरडस गाव येथील शेतकऱ्यांना बसला आहे. गोपेगावजवळील पुलाला बॅक वॉटरचे पाणी साचून राहत असल्याने या पुलाच्या पाण्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुलाला बारमाही पाणी राहत असल्याने या भागातील जवळपास 150 शेतकऱ्यांना शेतीसाठी पर्यायी सात ते आठ किमी अंतर कापून शेत गाठावे लागत होते. मागील काही वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मुंजाभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली पुलासाठी सातत्याने जायकवाडी विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला.
दरम्यान, पुलाचे काम करण्यासाठी ढालेगाव बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने लघु पाटबंधारे विभागाकडे केली होती. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लघु पाठबंधारे विभागाने ढालेगाव बंधाऱ्यातीलपाणी पातळी कमी करण्यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार 1 मार्च रोजी रात्री 9 ते पहाटे 2 वाजेच्या दरम्यान ढालेगाव येथील बंधाऱ्यातून 8800 क्युसेक ने 3.630 दलघमी पाण्याचा विसर्ग खालच्या मुदगल आणि तारुगव्हाण बंधाऱ्यात करण्यात आला.
ढालेगाव बंधाऱ्यात 7.80 दलघमी पाणी साठा..
गोदावरी नदीच्या पात्रात तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याची पाणी क्षमता 14.87 दलघमी इतकी आहे. 1 मार्च रोजी बंधाऱ्यातून 3.630 दलघमी पाणी सोडण्यात आल्यानंतर आता या बंधाऱ्यात 7.80 दलघमी जिवंत पाणी साठा आहे. म्हणजेच बंधाऱ्यात आज 57.76 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे
आंदोलनाला यश
गोपेगाव जवळील पुलाचे काम करण्यात यावे यासाठी मागील काही वर्षे येथील शेतकरी संघर्ष करत होते. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने तोडगा काढत पुलासाठी बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी केला. हे शेतकऱ्यांच्या लढ्याचे यश आहे.
- ज्ञानेश्वर काळे