गंगाखेडमध्ये १७ ते २० सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 07:07 PM2020-09-15T19:07:45+5:302020-09-15T19:09:06+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोरोना प्रतिबंध कृती समितीचा निर्णय
गंगाखेड : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील व्यापारी संघटना आणि कोरोना प्रतिबंध कृती समितीच्या वतीने १३ सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली असून, १७ ते २० सप्टेंबर या काळात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
गंगाखेड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे़ सद्यस्थितीत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे़ एका ग्रामविकास अधिकाऱ्यासह शहर व तालुक्यातील १८ जणांचा कोरोनमुळे मृत्यू झाला आहे़ हा संसर्ग वाढत असल्याने तालुक्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने शहरातील जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन रविवारी बैठक घेतील़ या बैठकीत १७ ते २० सप्टेंबर या काळात स्वयंर्स्फूतीने जनता कर्फ्यू लागू करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला़ या जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत औषधी दुकाने आणि सकाळी ७ ते ११ यावेळेत खत, बियाणांची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे़
गंगाखेडमध्ये माजी आमदारासह पोलीस कर्मचारी बाधित
येथील पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील बाधित रुग्णांची संख्या १५ झाली आहे. शहर व तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात १४ सप्टेंबर रोजी १७ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यात गंगाखेड पोलीस ठाण्यातील ३५ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्यासह भंडारी कॉलनीतील ६६ वर्षीय पुरुष, पाठक गल्लीतील ७२ वर्षीय पुरुष, बळीराजा कॉलनीतील ७० वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला आणि बीड येथील ४० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. ३४१ जण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले असून, १०८ जणांवर उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.