जारची पाणीविक्री २५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:18 AM2021-04-28T04:18:41+5:302021-04-28T04:18:41+5:30
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने लावलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच व्यवसायाला बसत आहे. परभणी शहरात साधारण ३०० ते ४०० पाणी जार ...
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने लावलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच व्यवसायाला बसत आहे. परभणी शहरात साधारण ३०० ते ४०० पाणी जार विक्रेते आहेत. शहरातील घरोघरी, हॉटेल, बाजारपेठेतील दुकाने, सरकारी, तसेच खासगी कार्यालये येथे जार विक्रेते पाण्याचे वितरण करतात. उन्हाळा सुरू झाल्यानंतर हा व्यवसाय दुपटीने वाढतो, परंतु यंदा केवळ घरगुती पाणी वितरण १०० टक्के तर इतर ठिकाणची विक्री २५ टक्क्यांवर आली आहे. यामुळे प्लान्टचा, वाहतूक, नोकरांचा पगार, भाडे किंवा कर्जाचे हप्ते यावर होणारा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती झाली आहे.
बोअरच्या पाणी वापरावर व्यवसाय
शहरात पाणी जार विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी खासगी बोअर पाडलेले आहेत. या पाण्याचा वापर करून प्लान्टमध्ये त्यावर प्रक्रिया केली जाते. यासाठी वीजबिल मोठ्या प्रमाणात येते, परंतु सध्या विक्रीवर परिणाम झाल्याने बिल भरण्यासही अडचणी येत आहेत.
विक्रेते - ३०० ते ४००
थंड पाणी जार - ३० रुपये
साधे पाणी जार - २० रुपये
केवळ घरोघरी विक्री
शहरात संपूर्ण बाजारपेठेत मिळून ४,०००च्या आसपास दुकाने तर १५० ते २०० शासकीय कार्यालये, बँका, खासगी कार्यालये आणि १०० ते १५० शाळा, महाविद्यालये आहेत. येथील विक्री ठप्प पडल्याने केवळ घरोघरी पाणी जार विक्री सुरू आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे.
कर्मचारी पगारावर ताण
साधारण उन्हाळ्यातील जारची विक्री ही दिवसाला १५० ते २०० इतकी असायची. यंदा ती ५० ते ६० वर आली आहे. यामुळे सर्व खर्च जाता कर्मचाऱ्यांचे पगार घरातून देण्याची वेळ आली आहे.
- मकरंद साखरेकर, व्यावसायिक.