जावयाच्या घराला सासऱ्याने लावले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:05+5:302021-03-14T04:17:05+5:30
येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास काशिनाथ पवार हे जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथे अनिल सोपानराव ...
येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास काशिनाथ पवार हे जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथे अनिल सोपानराव चव्हाण यांच्या घरी किरायाने घर घेऊन राहतात. घरगुती वादातून त्यांच्या पत्नीने जिंतूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध तक्रार दिल्याने त्यांच्या व त्यांच्या परिवाराविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पवार हे किरायाच्या घरात राहत नाहीत. १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता ते सावंगी म्हाळसा येथील घरी गेले असता त्यांना त्यांच्या घराच्या कुलूपावर आणखी एक कुलूप दिसून आले. याबाबत त्यांनी घरमालकांना विचारणा केली असता त्यांनी त्यांचे सासरे सुनिल विश्वनाथ शिंदे, (रा. योगेश्वरी नगर, जिंतुर रोड परभणी) यांनी कुलूप लावल्याचे व चावी ते सोबत घेऊन गेल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चावी घेऊन येऊन घर उघडा असे घरमालक चव्हाण यांनी सांगितले. पवार यांनी तातडीने जिंतूर पोलीस ठाणे गाठून सुनिल विश्वनाथ शिंदे यांच्याविरूद्ध फिर्याद दिली. त्यात आपल्या घरात रोख ५० हजार रुपये, विविध कागदपत्रे, एक पाच तोळ्याचा सोन्याचा हार व घरगुती साहित्य घरात आहे. आपल्या घरास परस्पर कुलूप अतिक्रमण केल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.