कोपरखळी घटनेच्या निषेधार्थ परभणीतील सराफा बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:24 PM2018-08-22T16:24:31+5:302018-08-22T16:33:42+5:30
पोलीस प्रशासनाकडून सराफा व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नसल्याने आणि कोपरखळी येथील दरोडा प्रकरणात पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यातील सराफा बाजार बंद ठेवण्यात आला.
परभणी : पोलीस प्रशासनाकडून सराफा व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक सहकार्य केले जात नसल्याने आणि कोपरखळी येथील दरोडा प्रकरणात पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्ह्यातील सराफा बाजार बंद ठेवण्यात आला.
परभणी जिल्हा सराफा असोसिएशनची बैठक जिल्हाध्यक्ष सचिन अंबिलवादे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ त्यात बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला़ श्रीरामपूर जिल्ह्यात पोलिसांच्या त्रासाला कंटाळून गोरख मुंडलिक नावाच्या सराफा व्यापाऱ्याने आत्महत्या केली़ त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील कोपरखळी येथे एका सराफा दुकानावर दरोडा पडला़ त्यात दरोडेखोरांच्या मारहारणीत सराफा व्यापाऱ्याचा मृत्यू झाला़ एवढी मोठी घटना घडल्यानंतरही पोलीस प्रशासन मात्र व्यापाऱ्यांना सहकार्य करीत नाही़ परंतु, कारवाई करण्यासाठी मात्र पुढे असते, असा आरोप या बैठकीत करण्यात आला.
राज्यात आतापर्यंत सराफा व्यापाऱ्यांवर ४८ दरोडे पडले आहेत़ परंतु, एकाही प्रकरणात माल हस्तगत झाला नाही़ तेव्हा कोपरखळी येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करावी, अशी मागणी करीत बंद पुकारण्यात आला. परभणी जिल्ह्यातील सर्व ३३६ सराफा दुकाने दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली़ या बैठकीस जिल्हाध्यक्ष सचिन अंबिलवादे यांच्यासह सुनील दहीवाल, दीपक टाक, रमेश दाभाडे, गोपाळ कुलथे, सुरेश शहाणे, सचिन दहीवाळ, राजेंद्र टाक, परमेश्वर डहाळे, कपील उदावंत, महेश नारलावार, अमीत कुलथे, राहुल दहीवाळ, प्रभाकर उदावंत आदींची उपस्थिती होती़