जिंतूर विधानसभा एकेकाळी होता शेकापचा बालेकिल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 01:03 PM2024-11-04T13:03:56+5:302024-11-04T13:04:36+5:30

१९८० च्या दशकात शेकापने मिळवला सलग दोनदा विजय ; त्यानंतर या पक्षाला लागली घरघर...

Jintur Vidhan Sabha was once a stronghold of Shetakari kamgar paksha! | जिंतूर विधानसभा एकेकाळी होता शेकापचा बालेकिल्ला!

जिंतूर विधानसभा एकेकाळी होता शेकापचा बालेकिल्ला!

- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू :
प्रारंभी १९७२ व १९७८ या दोन्ही वेळी जिंतूर विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला ठरला होता. त्याचा परिणाम यावेळी त्यांचे सलग दोनवेळा आमदार निवडून आले. पण या बालेकिल्ल्याचा बुरूज पुढे हळूहळू ढासळत गेला.

जिंतूर विधानसभा क्षेत्राची निर्मिती १९७२ ला झाली. या पहिल्याच निवडणुकीत ४२ हजार ३६७ एवढे मतदान झाले होते. त्यापैकी शेकापचे शेषराव देशमुख यांनी ६२ टक्के म्हणजे २६ हजार ३०६ मतदान घेत पहिले आमदार होण्याचा बहुमान मिळविला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे आनंदराव देशमुख यांना १० हजार ५५९ मते मिळाली. त्यानंतर १९७८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ५४ हजार ५३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मात्र शेकापचे मताधिक्य घटत ते ३१ टक्क्यांवर आले. शेकापचे गुलाबचंद राठी हे १७ हजार २४७ मते घेऊन विजयी झाले. तर आय काँग्रेसचे माणिकराव भांबळे यांना १६ हजार ६२१ मते मिळाली. त्यांचा ६२६ अशा अल्प मताने निसटता पराभव झाला. सलग दोनदा शेकापची सत्ता असलेल्या जिंतूर विधानसभेच्या त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र १९८० आय काँग्रेस, १९८५ ते १९९९ काँग्रेस, २००४ अपक्ष, २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस, तर २०१९ ला भाजप असा राहिला. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्यात याच पक्षाला अखेरची घरघर लागली.

अशी झाली १९७२ ची निवडणूक
शेषराव देशमुख शेकाप २६३०६
आनंद देशमुख काँग्रेस १०५५९
रामराव शिंदे अपक्ष ३७२७
सखाराम पवार अपक्ष १७७५

१९७८ च्या निवडणुकीत काय झाले?
गुलाबचंद राठी शेकाप १७२४७
माणिकराव भांबळे आय काँग्रेस १६६२१
खुशालराव घुगे अपक्ष १३१४९
भगवानराव थिटे जनता पार्टी ३८८९
सखाराम पवार अपक्ष ३५३२

असे घटत गेले शेकापचे मताधिक्य
१९७२ शेषराव देशमुख २६,३०६ (६२ टक्के) विजयी
१९७८ गुलाबचंद राठी १७२४७ (३१ टक्के) विजयी
१९८० नागोराव नागरे १३५५३ (२३ टक्के) तिसऱ्या स्थानी पराभूत.
१८८५ शेषराव देशमुख २५५७४ (३४ टक्के ) दुसऱ्या स्थानी पराभूत
१९९० गंगाधर घुगे १८३१८ (१८ टक्के) तिसऱ्या स्थानी पराभूत.
१९९५ आशा गायकवाड ११०६ (०.९ टक्के) नवव्या स्थानी पराभूत
१९९९ ते २०१९ पर्यंत या पक्षाचा उमेदवार नव्हता.

शेकापचे शेषराव देशमुख हे दुसऱ्यांदा आमदार होऊ शकले नाहीत
पहिले आमदार असलेले शेकापचे शेषराव देशमुख यांनी पक्षाकडून १८८५ साली पुन्हा जिंतूर विधानसभेची निवडणूक लढविली. यावेळी मात्र काँग्रेसचे गणेशराव दुधगावकर यांनी ८ हजार २५९ मतांनी शेषराव देशमुख यांचा पराभव करीत विजय मिळविला. दुधगावकर यांना ३३ हजार ८३३ मते मिळाली होती. तर देशमुख यांना २५ हजार ५७४ मते मिळाली. यामुळे देशमुख यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली नाही.

Web Title: Jintur Vidhan Sabha was once a stronghold of Shetakari kamgar paksha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.