''...फक्त बस वेळेवर पाठवा''; मानवत येथे बससाठी विद्यार्थिनीचा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:05 PM2018-09-18T17:05:40+5:302018-09-18T17:07:40+5:30
वारंवार मागणी करूनही मानव विकासची बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थिनीनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.
मानवत (परभणी) : वारंवार मागणी करूनही मानव विकासची बस वेळेवर येत नसल्याने संतप्त विद्यार्थिनीनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. यात मानोली व झरी येथील विद्यार्थिनीचा सहभाग होता.
तालुक्यातील मानोली येथे मानव विकास मिशनची बस येण्याची वेळ सकाळी सात वाजता आहे. मात्र बस येण्यास वारंवार उशीर होतो. काही वेळा तर बसची फेरीच रद्द करण्यात येते. विद्यार्थिनीना वेळेवर पास देण्यात येत नाही. याबाबत पालकांनी वारंवार आगार प्रमुखांकडे व वाहतूक नियंत्रकाकडे तक्रारी केल्या होत्या.
यामुळेच ३ सप्टेंबरला पालकांनी उशीरा आलेली बस गावातच रोखून धरली. यानंतर बस नियमित सोडण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु यानंतरही बस वारंवार उशिरा धावत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थिनीनी व पालकांनी शहरातील महाराणा प्रताप चौकात ठिय्या आंदोलन केले. तब्बल तासभर त्यांनी रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दिनकर यांनी विद्यार्थिनीची समजून काढण्याच्या प्रयत्न केला. शेवटी वाहतूक नियंत्रक पि व्ही सुरवसे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थिनीने आपले आंदोलन मागे घेतले