कठुआ, उन्नाव प्रकरणी परभणीत कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:03 AM2018-04-21T00:03:03+5:302018-04-21T00:03:03+5:30

जम्मू-काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दुपारी शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला़

Kadua, in the case of Unnao, the purakhanat kadakadatite closed | कठुआ, उन्नाव प्रकरणी परभणीत कडकडीत बंद

कठुआ, उन्नाव प्रकरणी परभणीत कडकडीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जम्मू-काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दुपारी शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला़
जम्मू- काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती़ या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे़ या पार्श्वभूमीवर परभणी येथे सर्वधर्म जातीय सलोखा मंच आणि मुस्लीम मुत्तहेदा महाज व इतर संघटनांच्या वतीने शुक्रवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते़ त्यानुसार सकाळपासूनच शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती़ सकाळी ११ च्या सुमारास काही भागामध्ये तुरळक प्रमाणात काही दुकाने उघडे होती़ ती दुकानेही युवकांच्या आवाहनानंतर बंद करण्यात आली़ त्यानंतर दुपारी ११़३० च्या सुमारास शहरातील रेल्वे स्थानकासमोर भारतीय मानवाधिकार असोसिएशन व युवक काँग्रेस आणि अन्य काही संघटनांच्या युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली़ त्यानंतर रेल्वेचे स्टेशन प्रबंधक देविदास भिसे यांना मागण्यांचे निवेदन दिले़ त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास शहरातील ईदगाह मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ सुभाष रोड, शिवाजी चौक, गांधी पार्क, मुल्ला मशिद, नारायण चाळमार्गे जिल्हा कचेरीसमोर मोर्चा दाखल झाला़ येथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी व्यासपीठावर मुफ्ती गौस, मौलाना रफियोद्दीन अशरफी, उपमहापौर माजू लाला, सय्यद खादर, मोहम्मद अल्ताफ, विजय वाकोडे, रवि सोनकांबळे, शकील मोईयोद्दीन, उमर चाऊस, फारुख बाबा, नदीम इनामदार, वसीम कबाडी, अली खान, उबेद शालीमार, मौलाना निसार, कलीम अन्सारी, डॉ़ अफ्फान खान, डॉ़ तय्यब बुखारी, अलीम खुरेशी, खारी इम्रान, जान मोहम्मद जानू, महेमुद खान, विशाल बुधवंत, जलालोद्दीन काजी, गौस झेन, अ‍ॅड़ शाहनवाज खान, कॉ़ राजन क्षीरसागर आदींची उपस्थिती होती़ यावेळी मुफ्ती कासमी, सय्यद खादर, रवि सोनकांबळे, अ‍ॅड़ विष्णू नवले, पवनकुमार शिंदे, अ‍ॅड़ अफजल बेग, राजन क्षीरसागर, विशाल बुधवंत आदींनी मार्गदर्शन केले़
या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाºयांना आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी पीडित मुलीच्या नावाने स्वतंत्र कायदा मंजूर करावा, सदरील खटले जलदगती न्यायालयात चालविण्यात यावेत, देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्यात यावीत, अशा घटना घडू नयेत, यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ सभेनंतर मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन दिले़ त्यानंतर मोर्चाचा समारोप झाला़
परभणीच्या : बाजारपेठेत शुकशुकाट
उन्नाव, कठुआ घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला़ दवाखाने, औषधी दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचे दिसून आले़ दररोज भाजीविक्रेते व किरकोळ विक्रेत्यांनी गजबजणारा क्रांती चौक व जुना मोंढा भाजीमार्केट परिसरातही शुक्रवारी शुकशुकाट दिसून आला़
पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ यासाठी पोलिसांनी फिक्स पॉर्इंट लावले होते़ साध्या वेषातील पोलीस कर्मचारी शहरात फिरताना दिसून आले़
तीन बसवर दगडफेक
शहरातील जिंतूर रोडवर दुपारी २ च्या सुमारास जिंतूर- परभणी (एमएच २० डीएल-२३१४), परभणी-जिंतूर (एमएच २०/बीएल-११०४), बिलोली-परभणी (एमएच २० बीएल-१२७०) या तीन बसवर दगडफेक करण्यात आली़ यामध्ये बसच्या काचा फुटल्या़ या प्रकरणी उशिरापर्यंत नानलपेठ, कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती़ तसेच शहरातील वसमत रस्त्यावरील शिवशक्ती परिसरातील दोन दुकानांवर दगडफेक करण्यात आली़ काही युवकांनी शहरात लावण्यात आलेले पोस्टरही फाडले़
सेलूत कँडल मार्च
उन्नाव व कठुआ यासह सेलू तालुक्यातील धनेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ सेलू शहरातील तरुणांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत २० एप्रिल रोजी कँडलमार्च काढण्यात आला़ या कँडल मार्चची सुरुवात शहरातील टिळक पुतळ्यापासून करण्यात आली़ समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला़ यावेळी झालेल्या सभेत महिला व युवतींनी सरकारच्या नाकर्तेपणाचा धिक्कार करत आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली़ या कँडलमार्चमध्ये लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग नोंदविला़

Web Title: Kadua, in the case of Unnao, the purakhanat kadakadatite closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.