हलकासा पाउस पडताच केरवाडी-सिरपूर रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:33 AM2021-02-21T04:33:13+5:302021-02-21T04:33:13+5:30
२० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर साधे गिट्टीचे टीपर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा एखाद्या लोकप्रतिनीधीला घडले ...
२० वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर साधे गिट्टीचे टीपर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा एखाद्या लोकप्रतिनीधीला घडले नाही. म्हणून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली. सध्या रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेले नाही. रस्ता मातीच्या थराला लागला. जागोजागी पाणी साचत असून तिथे चिखल तयार होत आहे. तो २-२ दिवस वाळत नाही. तोपर्यंत वाहतूक ठप्प होते. पायी देखील चालता येत नाही. वाहने तर दुरचीच बाब राहिली. तरीही वाहने नेण्याचा प्रयत्न केल्यास ते फसत आहेत. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. १९ फेब्रुवारी रोजी पालम तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने हा रस्ता बंद झाला. तो शनिवारपर्यंत सुरू होवू शकला नाही. झालेल्या पावसाळ्यात या समस्येला सिरपूरसह सहा गावातीत ग्रामस्थ तोंड देवून वैतागले आहेत. त्यात सिरपूर पलिकडील सायळा, उमरथडी, खुर्लेवाडी, धनेवाडी, रावराजूर, रोकडेवाडी गावचा समावेश आहे. रस्त्यासाठी अनेकवेळा निवेदने, विनंत्या केल्या. तरीही त्याकडे साफ दुर्लक्ष केल्या जाते. परंतु जिल्हा परिषद ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकीपूर्वी रस्ता डांबरीकरणाचे आश्वासन सर्व उमेदवारांकडून दिल्या जाते. जशाही निवडणुका आटोपल्या की, लोकप्रतिनीधी गावाकडे फिरकतही नाहीत. आगामी पावसाळ्यापुर्वी रस्ता दुरूस्त झाला नसल्यास वाहतुकीसाठी ग्रामस्थांना हिवाळ्याची वाट पाहवी लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी हा रस्ता दुरूस्त करवा, त्याचे डांबरीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.