पाथरी तालुक्यातील 40 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके मोजतायेत अखेरची घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:59 PM2018-09-12T13:59:30+5:302018-09-12T14:01:38+5:30
पावसाने मारलेली दडी, उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिके धोक्याच्या पातळीवर गेली आहेत
- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी ) : गेल्या दोन तीन आठवड्याहून अधिक काळ पावसाने मारलेली दडी, उन्हाची वाढणारी तीव्रता यामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिके धोक्याच्या पातळीवर गेली आहेत. लांबलेल्या पावसाने तब्बल 37 हजार 497 एकर वरील सोयाबीन पीक माना टाकू लागले आहे. तसेच 45 हजार 805 एकर क्षेत्रावरील कापूस पिकावर रोगराई चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके सलाईनवर असून 40 हजार हेक्टर क्षेत्राखालील खरीप पीक धोक्यात आली आहेत. तालुक्यात एकूण सारसरीच्या केवळ 52 टक्के तीन महिन्यात पाऊस पडला आहे, येत्या काही दिवसात चांगला पाऊस पडला नाही तर संपूर्ण हंगाम हातचा जाण्याचा मार्गावर आहे.
पाथरी तालुका हा गोदावरी नदी आणि जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या पट्ट्यात येतो. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्या तरी या भागात बारमाही शेतीसाठी सिंचन होत नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पावसावरच अवलंबून असतात, पर्यायाने बागायती क्षेत्र ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. तालुक्यात खरीप हंगामात 46 हजार 710 हेक्टर क्षेत्र आहे, त्यात प्रत्यक्ष पेरा 40 हजार 810 हेक्टर आहे, गत वर्षी कपाशीचे क्षेत्र 23 हजार 500 हेक्टर होते ,बोन्ड अळीने या वर्षी क्षेत्रात घट झाली ,प्रत्येक्ष पेरा 18 हजार हेक्टर वर आला, तर तुरीचे क्षेत्र 3हजार 986 हेक्टर आहे,त्याच बरोबर मुगाचा पेरा 2 हजार105 एकर एवढा आहे.
गेली अनेक वर्षापासून या भागात खरिपाच्या 60 टक्के क्षेत्रात कापूसाची लागवड केली जात असे, बोटी कापसाच्या वणावर ही मोठया प्रमाणावर बोन्ड अळी आणि रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने कापसाच्या घटलेल्या उत्पनाने या भागातील शेतीचे पुर्णतः अर्थकारण बिघडून गेले आहे. पारंपरिक पद्धतीने कापूस पीक बेभरवशाचे बनले गेले आहे, कापूस लागवडीसाठी आणि संगोपन साठी लागणार खर्च आणि उत्पनाची तफावत या मुळे मागील काही वर्षात सोयाबीन चा पेरा ही वाढला आहे. कापसावर रोगांचा प्रादुर्भाव आणि अल्प काळात निघणाऱ्या सोयाबीन ला पाऊसच झटका या मुळे खरीप हंगामातील दोन्ही प्रमुख पिके बेभरवशाची झाली आहेत.
या तालुक्यात बाभळगाव मंडळ वगळता इतर भागात सुरुवातीला चांगला पाऊस पडला खरा मात्र त्या नंतर पावसाने मधल्या काळात खंड दिला. सोयाबीन येन फुलात असताना पाऊस लांबला, त्याचा फटका बसला.ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या आठवड्यात पाऊस पडला, त्या नंतर मात्र गेल्या 15 ते 20 दिवसा पासून पावसाने दडी मारली आहे. सध्या सोयाबीन ला शेंगा लागल्या आहेत, शेंगा भरण्या ची वेळ असताना पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहे, कापूस पिकावर महागडी औषधी फवारणी करून ही रोगराई कमी होत नाही, त्या मुळे खरीप हंगामातील पिके आता शेवटची घटका मोजत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
सरासरी 52 टक्के पाऊस
पाथरी तालुक्याचे सरासरी पावसाचे प्रजन्यमान 768.50 मिमी एवढे आहे, जून ते ऑगस्ट याकाळात सरासरी 511.34 मी मी पाऊस पडतो , मात्र या वर्षी या काळात म्हणजे च 3 महिन्यात सरासरी 400.83 मिमी पाऊस पडला म्हणजेच तीन महिन्यांच्या काळात फक्त 52 टक्के पाऊस पडला आहे. येत्या काही दिवसात चांगला पाऊस पडला नाही तर संपूर्ण हंगाम हातचा जाण्याचा मार्गावर आहे.