अपहरण करून बालकांची विक्री करणारी टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघड
By राजन मगरुळकर | Published: March 9, 2023 05:31 PM2023-03-09T17:31:06+5:302023-03-09T17:31:15+5:30
बालकाच्या अपहरणाचे तीन गुन्हे उघड; चार आरोपी वाढले
परभणी : पैशांसाठी लहान मुलांचे अपहरण करून त्यांना विकणारी आंतरराज्य टोळी परभणी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतली. यापूर्वी कोतवाली हद्दीतील एका बालकाची सुखरूप सुटका केल्यावर आता गुरुवारी पुन्हा एकदा कोतवाली हद्दीतील अन्य एका बालकास शोधून आणण्यात पोलीसांना यश आले. पोलिसांनी या बालकास पालकांच्या स्वाधीन केले आहे. या टोळीमध्ये आता नवीन चार आरोपींची भर पडली आहे. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या १५ झाली आहे.
आंतरराज्यात लहान मुलांचे अपहरण करून त्यांना लाखो रुपयांना विकणारी टोळी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या तपासातून पकडण्यात आली. त्यांच्या ताब्यातून अपहृत केलेल्या मुलांचा शोध लावण्यात आला आहे. आतापर्यंत पोलीस दलाने कोतवाली हद्दीतील दोन व पालम येथील एक गुन्हा उघडकीस आणला आहे. एप्रिल २०२२ मध्ये कोतवाली ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ वर्षीय मुलाचे अज्ञाताने अपहरण केले, अशा तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. त्यानुसार पोलिसांनी मागील काही दिवसात तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. त्यात तपासामध्ये पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. अपहृत केलेल्या मुलाचा शोध लावल्यानंतर त्यास पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
अन्य दोन अपहृत बालके बालकल्याण समितीकडे
या सर्व टोळीच्या माध्यमातून तपास सुरू केल्यावर पोलिसांना एकूण दोन बालके आढळून आली आहेत. यापूर्वी पालम तालुक्यातील एक मुलगा सुद्धा पोलिसांनी शोधून आणला. आतापर्यंत एकूण तीन गुन्हे उघड झाल्यावर याच आरोपींकडून अन्य दोन अपहृत बालकांचाही शोध लावण्यात पोलिसांना यश आले. या दोन अपहृत बालकांना परभणीच्या बालकल्याण समितीकडे पुढील कार्यवाहीस्तव हजर करण्यात आले आहे.
यांनी बजावली कामगिरी
पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, प्रदीप काकडे, संजय करनूर यांच्या अधिपत्याखालील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे, मारुती करवर, कल्पना राठोड, पोलीस उपनिरीक्षक राधिका भावसार, साईनाथ पुयड, मारुती चव्हाण, व्यंकट कुसुमे, नागनाथ तुकडे, शकील अहमद, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, स्वप्निल पोतदार यांच्यासह क्युआरटी, कोतवाली, पालम, नवा मोंढा, स्थागूशा, सायबरच्या अंमलदारांनी हा तपास केला आहे.