पशूधनाच्या सुदृढ आरोग्यासाठी किक्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:13+5:302021-01-19T04:20:13+5:30
विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारामुळे पशूधनाचे आरोग्य धोक्यात येते. या आजारांपासून पशूधनाचा बचाव व्हावा, त्याचप्रमाणे शेतामध्ये उगवलेल्या पिकांना कीड आणि ...
विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारामुळे पशूधनाचे आरोग्य धोक्यात येते. या आजारांपासून पशूधनाचा बचाव व्हावा, त्याचप्रमाणे शेतामध्ये उगवलेल्या पिकांना कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी किक्रात हा सण साजरा केला जातो. मानवत तालुक्यातील टाकळी निलवर्ण या ठिकाणी ही परंपरा आजही पाळली जाते. दरवर्षी दुधना नदीच्या पात्रात हा सण साजरा केला जातो. यावर्षी देखील रविवारी किक्रातचा सण साजरा करण्यात आला. शेतातील ज्वारी आणि करडईची झाडे आणून नदी काठी या झाडांची पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या पशूधनावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, त्या जनावरांची चिखलाची प्रतिमा तयार करून त्या प्रतिमेची पूजा केली जाते. प्रतिमेस नैवेद्य दाखवून त्यानंतर गावकऱ्यांना जेवण दिले जाते. ज्वारीचे बाटूक जनावरांना टाकून त्यानंतर सर्व गावकरी नदीकिनारी जेवणासाठी एकत्र बसतात. गावातून भाकरी जमा करून नदीकाठी तयार केलेले वरण आणि भाकरीचा आस्वाद घेतला जातेा.
पशूधनाच्या सुदृढ आरोग्यासाठी वर्षानुवर्षापासून सुरू असलेली ही परंपरा अखंडित आहे. टाकळी निलवर्ण गावातील ग्रामस्थ ही परंपरा भक्तीभावाने साजरी करतात. संक्रांतीनंतर हा सण शक्यतो साजरा केला जातो. यावर्षी १७ जानेवारी रोजी गावात उत्साहाने किक्रात साजरी करण्यात आली.