पेट्रोल-डिझेलच्या दरांनी किचन कोलमडले; किराणा, भाजीपाला महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:16+5:302021-07-05T04:13:16+5:30
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज वाढत असल्याने महागाईचा भडका उडाला ...
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती रोज वाढत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. विशेष म्हणजे, पेट्रोलसह डिझेलचे दरही आता शंभरीकडे पोहोचू लागले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. डिझेलच्या किमतीही वाढत असल्याने मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. परिणामी बाहेरगावाहून आवक होणाऱ्या भाजीपाल्यासह किराणा मालाच्या किमतीही तेवढ्याच वाढल्या आहेत. इंधनाच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडून गेले आहे. नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत.
परभणी पेट्रोल १०७ रुपये लिटरपर्यंत पोहोचले आहे; तर डिझेलही ९७.९५ रुपये प्रतिलिटर या दराने विक्री होत आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच जिल्ह्यातील नागरिक आर्थिक संकटात असताना त्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्याने आर्थिक अडचणीही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या वाढलेल्या महागाईचा सर्वसामान्य नागरिकांकडून निषेध केला जात आहे.
डाळी, खाद्यतेल महागले
मागील वर्षीच्या तुलनेत डाळ आणि खाद्यतेलाचे दर १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. मध्यंतरी खाद्यतेल १६५ रुपये लिटरपर्यंत पोहोचले होते. ही दरवाढ कमी झाली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत १५ रुपयांनी खाद्यतेल महागले आहे. सोयाबीन तेल मागील वर्षी १०० रुपये लिटर या दराने विक्री झाले. या वर्षी सोयाबीन तेलाचा दर १३५ रुपये लिटर असा आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी ८० रुपये किलो या दराने विक्री होणारी तूरडाळ सध्या ९५ रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे. चणाडाळीचे दर मात्र स्थिर आहेत.
गवार ८० रुपये किलो
जिल्ह्यात भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत. गवारीच्या शेंगा ८० रुपये किलो या दराने विक्री होत आहेत. त्याचप्रमाणे पानकोबी, फूलकोबी, वांगी ६० रुपये किलो या दराने विक्री होत आहेत. बटाट्याचे दर हे ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. सिमला मिरची, कारले, दोडके, मेथी, पालक या भाज्यांचे दरही कडाडले आहेत.
इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा फटका किराणा बाजारभावावरही झाला आहे. विशेष म्हणजे त्यात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तेलाबरोबरच तूरडाळीच्या किमतीही वाढलेल्या आहेत. मात्र साखर, चणाडाळीच्या किमती स्थिर आहेत. एकंदर या दरवाढीचा फटका व्यापाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.
विष्णू वट्टमवार, व्यापारी
बिटावर भाजी महाग मिळत असल्याने आम्हाला त्याच दराने भाजी विक्री करावी लागते. मागील सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत. ४० ते ५० रुपये किलो विक्री होणाऱ्या भाज्या ६० ते ८० रुपये किलो या दराने विकाव्या लागत आहेत. त्यामुळे व्यवसायात अधिक रक्कम गुंतवावी लागत असून, त्याचा फटका बसत आहे.
रमेश रणेर, भाजी विक्रेता
मागच्या काही महिन्यांपासून किराणा मालावरील खर्च वाढला आहे. महिन्याकाठी किराणा साहित्यासाठी राखून ठेवलेल्या रकमेत महिन्याभराचा किराणा येत नाही. त्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागत आहे. त्यातच तेल, डाळींच्या किमती वाढल्याने महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
योगिता हलगरकर, गृहिणी
भाजीपाल्याबरोबरच किराणा बाजारपेठेत वाढलेल्या महागाईमुळे आम्ही त्रस्त आहोत. महिन्याकाठी ठरावीक रकमेचे नियोजन केले जाते. मात्र त्यात महिन्याचा किराणा आणि भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सहा महिन्यांपासून या किमती वाढतच चालल्याने महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.