मंगळवारपासून सुरू होणार कोविड केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:12 AM2021-02-22T04:12:02+5:302021-02-22T04:12:02+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत असल्याने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या असून, मागच्या दोन महिन्यांपासून बंद ...
परभणी : कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत असल्याने प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या असून, मागच्या दोन महिन्यांपासून बंद केलेेले कोविड केअर सेंटर २३ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची तयारी केली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहरासह तालुक्याच्या ठिकाणी सुरू असलेले कोरोना केअर सेंटर बंद करण्यात आले होते. शहरात आय.टी.आय. हॉस्पिटल या एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन त्याच ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र मागच्या एक आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोनाचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोनाच्या अनुषंगाने कडक उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील बंद असलेले कोविड केअर सेंटर पूर्ववत सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. कोरोनाच्या संसर्ग काळात शहरात अक्षदा मंगल कार्यालय आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात हे केंद्र सुरू होते. हे दोन्ही केंद्र येत्या मंगळवारपासून सुरू केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणचे कोविड केंद्रही सुरू केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी पुन्हा एकदा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
मनपा हद्दीत पथकांची स्थापना
नागरिकांनी कोरोनाच्या प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करावी यासाठी शहराच्या हद्दीत पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार अजूनही कडक अंमलबजावणी होत नसली तरी उपाययोजना सुरू झाल्या आहेत.
ट्रेसिंग, टेस्टींग वाढविल्या
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क आणि लो रिस्क नागरिकांची यादी आता तयार केली जात आहे. त्याचप्रमाणे आरटीपीसीआरच्या चाचण्याही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. पूर्वी केवळ रुग्णांच्या संपर्कातील केवळ १० जणांचा शोध घेतला जात होता. आता २० जणांची यादी तयार केली जात आहे.