अनलॉकमध्येही धावेना ग्रामीण भागात लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:08+5:302021-07-20T04:14:08+5:30
परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत एस.टी. महामंडळाने लांबपल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत; मात्र ...
परभणी : येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत एस.टी. महामंडळाने लांबपल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बसेस सुरू केल्या आहेत; मात्र ग्रामीण भागातील अर्ध्याहून अधिक फेऱ्या बंद असल्याने एस.टी.महामंडळाची लालपरी केवळ शहरवासीयांसाठीच धावते की काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील प्रवाशांना पडू लागला आहे.
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील सात आगारांचा समावेश आहे. या सात आगारांकडे ४४५ बसेस आहेत. या बसेसच्या माध्यमातून कोरोना संसर्गाच्या अगोदर दरदिवस १८३५ फेऱ्या करण्यात येत होत्या. यातून एकट्या परभणी बसस्थानकावर १० हजार प्रवाशांची ने-आण करण्यात येत होती.
मात्र आता अनलॉक झाले असतानाही सात आगारातून केवळ ११२६ बसफेऱ्या करण्यात येत आहेत. त्यातही शहरी भागातच जास्त बसेस धावत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाची लालपरी कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात
आहे.
७०९ बसफेऱ्या
अद्यापही बंदच
कोरोनाच्या संसर्गाच्या आधी एस.टी.महामंडळाच्या १८३५ फेऱ्या नियमित होत असत; मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने महिनाभरापासून बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. केवळ ११२६ बसफेऱ्याच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाला ७०९ बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत.
उत्पन्न वाढेना
कोरोना संसर्गाच्या आधी एस.टी.महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत जवळपास १८३५ फेऱ्या दिवसभरात होत होत्या. यातून दिवसभरात ५० लाखाहून अधिक उत्पन्न एस.टी.महामंडळाच्या सात आगारांना मिळत होते; मात्र सध्या केवळ ११२६ बसफेऱ्या सुरू आहेत. त्यातही बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
दिवसाकाठी कसेबसे १९ लाख रुपयांचे उत्पन्न एस.टी.महामंडळाच्या हातात पडत आहे. त्यामुळे महिनाभरापासून एस.टी.महामंडळाची सेवा सुरू होऊनही उत्पन्न वाढत नसल्याने प्रशासनाच्या काळजीत भर पडली आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविल्यास उत्पन्नात भर पडेल.
सेलू, जिंतूर, पाथरी शहरांकडेच ओढा
जिल्हा प्रशासनाने एस.टी. महामंडळाला परवानगी दिल्यानंतर विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून आगार प्रमुखांना बस सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
मात्र आगार प्रशासनाने ग्रामीण भागात प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक बसेस सुरू करणे गरजेचे होते;
मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पाथरी, सेलू, जिंतूर या शहरांकडे सर्वाधिक बसफेऱ्या सुरू झाल्या.