चालत्या बसमधून सोन्याचे दागिने केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:17 AM2021-01-25T04:17:55+5:302021-01-25T04:17:55+5:30
लातूर येथून परभणीकडे जाणारी बस २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड येथून परभणीकडे निघाली. परळी नाका ...
लातूर येथून परभणीकडे जाणारी बस २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड येथून परभणीकडे निघाली. परळी नाका परिसरातून बसमध्ये चढलेल्या ४ महिलांपैकी २ महिलांनी बसमधून अंबाजोगाई ते परभणी असा प्रवास करणाऱ्या शेख शगुफ्ता मोहंमद अन्वर (रा. साखला फ्लॉट परभणी) या प्रवासी महिलेच्या बॅगवर आपली बॅग ठेवत लहान मुलास घेऊन बॅगजवळ ठाण मांडले. दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास बस परभणी येथे पोहोचताच शेख शगुफ्ता मोहंमद अन्वर या उतरण्यापूर्वीच चारही महिला बस स्थानक येण्यापूर्वीच बसमधून उतरून निघून गेल्या, तर शेख शगुफ्ता या परभणी येथील उड्डाणपुलाजवळ उतरून घरी गेल्या. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या बॅगमध्ये ठेवलेला सोन्याच्या दागिन्यांचा डब्बा पाहिला असता तो मिळून आला नाही. या डब्यात असलेला तीन तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार, दीड तोळे वजनाचे नेकलेस, दीड तोळे वजनाची गल्सर, दोन ग्राम वजनाच्या दोन व एक ग्राम वजनाची सोन्याची एक अंगठी असा एकूण साडेसहा तोळे वजन असलेले अंदाजे ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच, शेख शगुफ्ता यांनी पतीसोबत परभणी येथील पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेली हकिकत सांगितली. तेव्हा तुम्ही गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार द्या, असे येथील पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटल्याने, त्यांनी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीवरून रविवार पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड ते परभणीदरम्यान बसमधून प्रवास करणाऱ्या चार संशयित महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि राजेश राठोड हे करीत आहेत. चालत्या बसमध्ये प्रवाशी महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने, अन्य प्रवासात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.