पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर पाच गावांचा तुटला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:08 PM2018-06-23T13:08:51+5:302018-06-23T13:11:52+5:30
पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.
पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ ३ फूट उंचीचा जुना पूल आहे. पाऊस पडताच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याचा प्रकार वारंवार घडतो. २३ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी वाढत गेल्याने या पुलावर ६ फूट पाणी वहात होते. त्यामुळे फळा, आरखेड, सोमेश्वर, घोडा, उमरथडी या गावांचा संपर्क चार तासांपासून तुटला आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते १२ या चार तासांसाठी मात्र पाचही गावांतील ग्रामस्थांना अडकून पडावे लागले. यापूर्वी ३ जून रोजी या गावांचा संपर्क तुटला होता.
भाविकांची गैरसोय
फळा येथे संत मोतीराम महाराज यांची समाधी आहे. प्रत्येक एकादशीला भाविकांची येथे दर्शनासाठी रांग लागते. शनिवारी एकादशी असल्याने भाविक फळा गावाकडे निघाले. मात्र वाटेत पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, अनेक भागात प्रत्यक्ष पेरण्यांना सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळे शेतकरी पेरता झाला आहे.