परभणी जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर; ८ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:31 PM2018-08-21T12:31:21+5:302018-08-21T12:31:52+5:30
पालम तालुक्यातील लेंडी नदीत पाण्याची आवक वाढल्याने तालुक्यातील ८ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे.
परभणी : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू असून, पालम तालुक्यातील लेंडी नदीत पाण्याची आवक वाढल्याने तालुक्यातील ८ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. तर ढालेगाव बंधाऱ्यातील पाणी पातळीत वाढ झाल्याने बंधाऱ्याचे एक गेट उघडण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५१.९९ मि.मी. पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ६२.८० मि.मी. आणि पाथरी तालुक्यात ६१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, या पावसामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगावचा बंधारा तुडूंब भरला असून, बंधाऱ्याचे एक गेट उघडून पाणी सोडून देण्यात आले आहे.
तसेच पूर्णा तालुक्यातील धोनरा काळे येथे पाच घरांच्या भिंती पडल्या असून, दोन शेळ्या दगावल्याची घटना घडली. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा, दुधना, थुना या नद्या दुथडी भरुन वहात आहेत. जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे ओढ्याच्या पाण्यात मोटारसायकल वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकंदर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा कहर सुरू आहे.