कंदील मोर्चा ! परभणीत विजेच्या भारनियमन व महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीची जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 06:12 PM2017-10-13T18:12:02+5:302017-10-13T18:16:13+5:30
अचानक वाढलेले विजेचे भारनियमन आणि वाढती महागाई याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला.
परभणी, दि. १३ : अचानक वाढलेले विजेचे भारनियमन आणि वाढती महागाई याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
दिवाळीचा सण तोंडावर आला असताना जिल्ह्यामध्ये विजेचे भारनियमन केले जात आहे. तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढत चालली आहे. या दोन्ही मुद्यांवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. येथील बी.रघुनाथ सभागृहापासून दुपारी १२ वाजेपासून या मोर्चाला प्रारंभ झाला. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन भारनियमनाचा विरोध केला. तसेच काही काळ रास्तारोको आंदोलन करुन आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईमध्ये वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात केले जाणारे विजेचे भारनियमन बंद करावे, शेतक-यांचे वीज बिल माफ करावे, कापूस व सोयाबीनसाठी हमीभाव केंद्र सुरु करावे आदी मागण्याचा यात समावेश आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भावनाताई नखाते, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सोनाली देशमुख, शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, गंगासागर वाळवंटे, रेखा आवटे, संगीता पवार, राधाबाई जोंधळे, मुमताज शेख, मीना रणबावळे, सोमित्रा लझडे, वनिता चव्हाण, जयश्री पुंडगे, सूमन वाळवंटे, संगीता खुणे, बालिका शिंदे, शिला मस्के, रत्नमाला शेंडे आदींसह मोठ्या संख्येने महिलांचा आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.