परभणी जिल्ह्यात दोन आठवड्यातच वार्षिक सरासरीच्या साडेनऊ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:22 AM2020-06-15T11:22:51+5:302020-06-15T11:31:30+5:30
१५ दिवसांमध्ये वार्षिक सरासरीच्या ९.८ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला
परभणी : जिल्ह्यात यावर्षी १ जूनपासून समाधानकारक पावसाने हजेरी लावली असून, १५ दिवसांमध्ये वार्षिक सरासरीच्या ९.८ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.
राज्यात या वर्षी सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसला. १४ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८५.२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८६८ मिलिमीटर असून, या सरासरीच्या तुलनेत ९.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ११३ मिमी, मानवत तालुक्यात ९९ मिमी, पालम ८९, सेलू ७७, परभणी ८३, जिंतूर ७६, पूर्णा ७० आणि गंगाखेड तालुक्यात ६० मिमी पाऊस झाला आहे.
दोन आठवड्यांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे. रविवारीही चार तालुक्यात पावसाने हजेरी लावली. गंगाखेड तालुक्यामध्ये १५.२५ मिमी पाऊस झाला असून, परभणी तालुक्यात ८.७५ मिमी, पालम ८ मिमी आणि मानवत तालुक्यात १ मिमी पाऊस झाला आहे. अद्याप पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात झाला नाही. ७५ ते १०० मिमी पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे.